

परळी वैजनाथ : परळी वैजनाथ शहरातील स्नेहनगर भागात मोकळ्या जागेत असलेल्या गाईंना डांबून त्यांची तस्करी करण्याच्या उद्देशाने घेऊन जाण्याचा खळबळजनक प्रकार दि. 25 रोजी मध्यरात्रीनंतर उघडकीस आला. हा प्रकार साधारण दोन वाजण्याच्या सूमारास घडला असुन या गाईंना गुंगीच्या गोळ्या खाऊ घालण्यात आल्याचेही पुढे आले आहे. दरम्यान याप्रकरणी आता स्नेहनगर मधील नागरिक संतप्त झाले असून संबंधित प्रकरणी दोषींवर कारवाई करून कडक शासन करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, परळी शहरातील स्नेहनगर या भागात मध्यरात्री दोन वाजल्यानंतर एक झायलो गाडी या भागात फिरत असताना दिसून आली. मोकळ्या मैदानात काही लोक या गाडीतून उतरले. त्यांनी चार गाईंना गुंगीच्या गोळ्या खाऊ घातल्याचे पुढे आले आहे. गुंगी येऊन या गाई खाली जमिनीवर कोसळल्यानंतर या गाई या 'झायलो' गाडीत डांबून टाकत असताना याच भागातील एका महिलेच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर काही लोक जमा होत असल्याचे दिसताच या गाडीतून उतरलेल्या लोकांनी तिथून पळ काढला. यानंतर स्नेहनगर मधील शेकडो नागरिक पोलीस ठाण्यात जमा झाले. गोवंश व गोमातेचे अशा पद्धतीने अमानुषरित्या गुंगीच्या गोळ्या देणे व तस्करीच्या उद्देशाने त्यांना घेऊन जाणे हा चीड व संताप आणणारा प्रकार असल्याचे या नागरिकांनी सांगितले. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर गुन्हा दाखल करून कठोर शासन करावे अशी मागणी या नागरिकांनी केली आहे. दरम्यान पोलीस याबाबत सखोल तपास करत असुन हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असल्याचीही माहिती आहे.
काल दि. 25 रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास स्नेहनगर मधील मोकळ्या मैदानात गाईंबाबत हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनास्थळावर खारी बुंदी, बिस्किटे, शेंगदाणे ,पाव आदी खाण्याच्या वस्तू सापडल्या. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना या भागातील नागरिकांनी बोलवले असता या पदार्थांना गुंगी येण्याचे औषध लावून त्यांना खाऊ घालण्यात आल्याचे प्राथमिक मत त्यांनी मांडले.
गुंगीचे औषध खाऊ घालण्यात आलेल्या या घटनेतील पीडित गाईंवर पशुवैद्यकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केलेले आहेत दरम्यान गुंगीचे औषध पोटात गेल्याने या गाई जमिनीवरच खूप वेळ निश्चित पडलेल्या होत्या सकाळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी येऊन या सर्व गाईंची तपासणी केली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत
गोवंश तस्करी व गायींना डांबून घेऊन जाण्याच्या अनेक प्रकरणांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून परळी शहरात एका झायलो गाडीची नेहमीच चर्चा असते. काही दिवसांपूर्वी परळीतील गोरक्षकांनी तीन दिवस बेमुदत उपोषण केले होते. या उपोषणावेळीही या उपोषणकर्त्यांनी प्रामुख्याने झायलो गाडीतूनच अशा पद्धतीचे कुकर्म परळीत घडतात असा आरोप केला होता. तसेच या गाडीचा शोध घेऊन ही गाडी कोणाची, व ही गाडी वापरून अशा पद्धतीची कृत्ये करणारे कोण? याचा शोध घ्यावा अशी प्रमुख मागणीनीही केली होती. ज्या ज्या वेळी गोवंश तस्करी,गुरे डांबून घेऊन जाणे हा विषय समोर येतो त्या त्या त्यावेळी झायलो गाडीची चर्चा होत असते.
याप्रकरणी स्नेह नगर भागातील नागरिक संतप्त झाले. नागरिकांनी पोलीस ठाणे गाठले व या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलीस प्रक्रिया सुरू झाली असुन या घटनेचा तपास करून पोलीस संबंधितांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. या नगर मधील झालेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद असल्याचेही समोर आले आहे.