

पैठण : परराज्यातल्या वाहनातून गायींची चोरी करून तस्करी करणाऱ्या वाहनाला शनिवारी पहाटे पैठण पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडले. यावेळी तस्करी करण्यात येणाऱ्या पाच गायींची सुटका केली असून वाहनासह ६ लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दि.२७ रोजी रात्री पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख आपल्या पोलीस सहकार्यासह पेट्रोलिंग ग्रस्त घालीत होते. यावेळी पहाटेच्या दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की शेवगाव तालुक्यातील घोटण या गावातून पाच ते सहा अनोळखी चोरट्यांनी गायीची चोरी केली आहे. चोरी करुन ते परराज्यातील क्रमांक RJ32GB -3454 या वाहनातून पैठणकडे येत आहेत. यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पो. कॉ कल्याण ढाकणे, नरेंद्र अंधारे, गायके, राजेश आटोळे यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास नवीन तहसील परिसरातून हे वाहन पळून जात असताना फिल्मी स्टाईल पाठलाग करून या वाहनाला पकडले. मात्र गायींची तस्करी करणारे पळून जाण्यात यशस्वी झाले.
या वाहनाची झडती घेऊन यामध्ये असलेल्या पाच गायींची सुटका केली.यामध्ये एक गाय आजारी असल्याने तात्काळ या गायीवर पोलीस ठाण्यात पशुवैद्यकीय पथकाकडून उपचार केला व इतर गायींना पैठण येथील विजयी पांडुरंग गोशाळेत सुखरूप सोडण्यात आले. या घटनेत पाटेगाव येथील शेतकरी ज्ञानदेव बाबुराव डोंगरे यांच्या घरासमोरील पत्र्याच्या शेड मधून ८० हजार रुपये किमतीची गाय देखील या चोरट्यांनी चोरल्यामुळं पैठण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ६ लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला.
पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार लक्ष्मण पुरी हे करीत आहे.