

बीड : आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यांच्या पाणीप्रश्नाचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून वर्षभरात ठोस निर्णय घ्यावा. समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून त्यात या तीन तालुक्यांना प्राधान्याने पाणी द्यावे, अशी मागणी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केली. शासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेतली नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
आष्टी-पाटोदा-शिरूरच्या पाणीप्रश्नासह दुष्काळी उपाययोजनांच्या मागणीसाठी सोमवारी (दि. 28) बीड शहरातील चहऱ्हाटा फाटा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. बैलगाड्यांचा सहभाग हे मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले. धोंडे आणि आजबे हेही बैलगाडीतून मोर्चात सहभागी झाले.
नगर रोडमार्गे निघालेल्या मोर्चान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर मोर्चा पुन्हा नगर रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. पाण्याच्या हक्कासाठी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले. मोर्चानंतर दोन्ही माजी आमदारांसह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. हे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी माजी आ बाळासाहेब आजबे, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, काकासाहेब शिंदे, विश्वनाथ नागरगोजे, दीपक घुमरे, वनवे दादा, भाऊसाहेब लटपटे, संतोष जाधव, नियामत बेग, सतीश झगडे, भाऊसाहेब भराटे, गुलाबराव घुमरे, अशोकराव साळवे, रेश्मा पवळ, वैभव बडे, अशोकराव दहिफळे, विष्णुपंत घोलप, संतोष चव्हाण, शामराव हुले आदी उपस्थित होते.
एक-दोन वर्ष वाया गेला : आजबे
माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी पाणीप्रश्नाच्या विलंबावरून सरकार आणि विद्यमान लोकप्रतिनिधींवर टीका केली. उजनी धरणातून थेट पाइपलाइनद्वारे आष्टी तालुक्याला पाणी देण्याच्या योजनेला आपण आमदार असताना मंजुरी मिळवून टेंडर प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, सत्ता बदलाच्या काळात विद्यमान आमदारांनी तक्रार केल्याने काम रखडले. त्यामुळे एक ते दोन वर्षांचा महत्त्वाचा कालावधी वाया गेला आणि मतदारसंघाला हक्काचे पाणी मिळण्यास विलंब झाला, असा आरोप आजबे यांनी केला.
धोंडेंचे सुरेश धस यांना प्रत्युत्तर
मोर्चात सहभागी न होण्याबाबत आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावर धोंडे यांनी टीका केली. चांगल्या कामात खोडा घालण्याची सवय आहे. या निर्णयाचे स्वागत करून मोर्चात सहभागी व्हायला हवे होते. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राची केवळ प्रत प्रसिद्ध केली आहे; प्रत्यक्ष मंजुरी कुठे आहे? असा सवाल त्यांनी केला. वाहून जाणाऱ्या पाण्याबाबत अद्याप कोणताही डिटेल सर्व्हे झालेला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.