

Ashti MSEDCL Bribery Case
कडा : बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे वाढते प्रकार पुन्हा एकदा समोर आले असून आष्टी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत महावितरणच्या महिला सहाय्यक अभियंत्याला रंगेहात अटक केली. या घटनेमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.
आष्टी येथील महावितरण कार्यालयात कार्यरत सहाय्यक अभियंता कोमल अर्जुन शिंदे यांनी तक्रारदाराकडून सौर ऊर्जा प्रकल्पाचे ऑडिट पूर्ण करून निधी मंजूर करण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. यानंतर एसीबीने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास लाच स्वीकारताना पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस उपाधीक्षक सोपान चितमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी खरसाडे, बीडकर आणि पुरी यांच्या पथकाने केली. पुढील गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून तपास सुरू आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात सातत्याने समोर येणाऱ्या लाचखोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी पैशांची मागणी वाढल्याच्या तक्रारींमुळे प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा चर्चेत आला आहे.
शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकाऱ्याने लाच मागितल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाते आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाते, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.
आष्टीसह बीड जिल्ह्यात वाढत्या लाचखोरीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. “सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पैसे द्यावे लागणे ही गंभीर बाब आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.