Beed Rain | पावसाने दगा दिला: दुष्काळाची चाहूल; पिके करपू लागली, विहिरींची पाणीपातळी खालावली

आष्टी तालुक्यात बळीराजा संकटात: चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर; हजारो रुपयांचा शेती खर्च वाया जाण्याची भीती
Beed Ashti Monsoon News
काही भागांतील पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.Pudhari
Published on
Updated on

Beed Ashti Monsoon News

राजू म्हस्के

कडा : आष्टी तालुक्यात यंदा पावसाच्या लहरीपणामुळे बळीराजाच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले तरी तालुक्यातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. अधूनमधून तुरळक सरी बरसत असल्या, तरी त्यात सातत्य नसल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. परिणामी कापूस, सोयाबीन, तूर, कांदा तसेच विविध फळपिकांना पाण्याचा ताण बसू लागला असून काही भागांतील पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.

पेरणीपासून आतापर्यंत शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च केले आहेत. मोठ्या अपेक्षेने उभे केलेले पीक आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, पावसाने आणखी ओढ दिल्यास हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. पिकांची वाढ खुंटू लागली असून, पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही तर तालुक्यातील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

Beed Ashti Monsoon News
Beed  Theatre Renovation Still Delayed| नाट्यगृहाच्या दुरुस्तीची तिसरी घंटा कधी वाजणार?

शासनाने कागदावर नव्हे, बांधावर जाण्याची गरज!

पावसाची अनिश्चितता लक्षात घेता प्रशासनाने केवळ कार्यालयात बसून परिस्थितीचा आढावा न घेता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्याची गरज आहे. गावोगावी पिकांची वस्तुनिष्ठ पाहणी करून जमिनीतील ओलावा, पिकांची सद्यस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्यांचा आढावा घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

संभाव्य नुकसानग्रस्त क्षेत्र निश्चित करून आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात. पिकांचे नुकसान वाढल्यानंतर पंचनामे करण्यापेक्षा आतापासूनच परिस्थितीवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पाऊस आणखी लांबल्यास नुकसानभरपाई, पाणी उपलब्धता, चारा आणि पशुधनाच्या संरक्षणासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Beed Ashti Monsoon News
Beed Accident : सरकीचा ट्रक पलटी होऊन चालक ३० फूट दरीत कोसळला

विहिरींची पाणीपातळी खालावली; टंचाईची चाहूल

पावसाअभावी आष्टी तालुक्यातील अनेक भागांत विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. काही ठिकाणी विहिरी कोरड्या पडण्यास सुरुवात झाली असून बोअरवेलवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांपुढेही मोठे संकट उभे राहिले आहे.

उपलब्ध पाण्यावर सिंचन करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना वीज, मोटार, पाइपलाइन, ठिबक सिंचन आणि पाण्याच्या वाढत्या खर्चाचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. पावसावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. त्यामुळे आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला आता एकच प्रश्न सतावत आहे

Beed Ashti Monsoon News
Beed News : गेवराई शहरामध्ये विजेचा लपंडाव

पशुधनही संकटात; चाऱ्याचा प्रश्न गंभीर

पावसाच्या लहरीपणाचा फटका केवळ पिकांनाच बसत नसून पशुधनालाही बसू लागला आहे. पावसाअभावी शेतातील गवताची वाढ खुंटल्याने हिरव्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे जनावरांसाठी बाहेरून चारा खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

आधीच शेतीचा वाढता खर्च आणि पिकांच्या नुकसानीची चिंता असताना जनावरांच्या चारा-पाण्याचा अतिरिक्त खर्चही शेतकऱ्यांच्या खिशाला झळ पोहोचवत आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास ‘पाणी मिळेना, चारा मिळेना आणि पीक वाचविता येईना’, अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

हजारो रुपयांचा शेती खर्च धोक्यात

पेरणीपासून आतापर्यंत आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीत मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आणि मजुरीवर खर्च करून उभे केलेले पीक आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे. वेळेत पाऊस झाला नाही तर संपूर्ण हंगामाचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आता केवळ आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष शेताच्या बांधावर उतरून मदतीची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत. प्रशासनाने संभाव्य नुकसानग्रस्त भागाची तातडीने पाहणी करून पाणी, चारा आणि पीक संरक्षणासाठी ठोस नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.

Beed Ashti Monsoon News
Beed Child Marriage | एकाच रात्री तीन बालविवाह; कानडी बुद्रुकमध्ये धक्कादायक प्रकार

शेतकऱ्यांचा संतप्त सवाल!

‘पेरणीपासून आतापर्यंत हजारो रुपये खर्च केले. आता पीक हातातोंडाशी येण्याआधीच पावसाने दगा दिला आहे. शासनाने परिस्थिती गंभीर होण्याची वाट पाहू नये. अधिकारी शेताच्या बांधावर यावेत, पिकांची पाहणी करावी आणि तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. नुकसान झाल्यास पात्र शेतकऱ्यांना वेळेत नुकसानभरपाई मिळावी.’

दूध व्यवसायावरही संकटाचे सावट

शेतीला जोडधंदा म्हणून आष्टी तालुक्यातील अनेक शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. दररोजचे रोख उत्पन्न मिळत असल्याने अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र, पशुखाद्य, चारा आणि इतर उत्पादन खर्च वाढत असताना दूध उत्पादकांना मिळणारे उत्पन्न अपुरे ठरत असल्याची स्थिती आहे.

पावसाअभावी हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने दूध उत्पादकांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दूध उत्पादकांना योग्य दर मिळावा, पशुखाद्याच्या किमती नियंत्रणात आणाव्यात आणि शासनाने दूध व्यवसायाला ठोस आर्थिक आधार द्यावा, अशी मागणी दूध उत्पादकांमधून होत आहे.

— श्रीराम सोनवणे, दूध उत्पादक, कडा

पाऊस आणखी लांबल्यास आष्टी तालुक्यात पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि चारा संकट एकाच वेळी उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घेऊन आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार चारा डेपो, पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या छावण्यांबाबतही पूर्वनियोजन करावे.

— ज्ञानेश्वर चौधरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news