उदय नागरगोजे
बीड : वीस वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या बीड येथील नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी साधारणतः आठ महिन्यांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री स्व. अजित पवार यांनी अवघ्या पाऊण तासाच्या विमान प्रवासात आठ कोटी 19 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा बीडमधील भाषणात केली होती. त्यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर या कामाची गती मंदावल्याचे दिसत असून आता या घोषणेला आठ महिन्यांपेक्षा अधिकचा काळ झाला तरी देखील प्रारंभ झालेला नसल्याने नाट्यप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात असून या नाट्यगृहाच्या दुरुस्तीची तिसरी घंटा कधी वाजणार? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
बीड जिल्ह्याला मोठी नाट्यपरंपरा आहे. बीडमधून मुंबईपर्यंत पोहचलेल्या अनेक कलाकारांनी सिनेसृष्टी, नाट्यसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. दिग्दर्शन, लेखन या क्षेत्रात देखील बीडमधील दिग्गज स्थिरावलेले आहेत. साधारणतः वीस वर्षांपूर्वी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या पुढाकारातून भव्यदिव्य असे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीडमध्ये उभारण्यात आले होते. यामुळे बीड शहरातील नाटधकलावंतांना व्यासपीठ उपलब्ध झाले होते. याबरोबरच मुंबई पुण्यामध्ये होणारे व्यावसायिक नाटकं देखील बीडमध्ये होऊ लागली होती. कालांतराने या नाट्यगृहाच्या दुरुस्तीकडे जे लक्ष द्यायला हवे होते, ते दिले गेले नाही. यामुळे नाट्यगृहातील आसनव्यवस्था, साऊंड सिस्टीम, प्रकाश व्यवस्था याची दुरवस्था झाली.
याबरोबरच कलाकारांसाठी असलेल्या खोल्यांमध्ये अस्वच्छता, स्वच्छतागृहांमध्ये सुविधांचा अभाव यामुळे या ठिकाणी प्रयोगासाठी येणाऱ्या कलावंतांमधूनही नाराजी व्यक्त होत होती. या नाट्यगृहाच्या इमारतीची दुरुस्ती केली जावी यासाठी नगरपालिकेकडून प्रयत्न केले जात होते, परंतु निधी मात्र मिळत नव्हता. परंतु स्व. अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्री स्विकारल्यानंतर त्यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहचल्यानंतर त्यांनी याच्या दुरुस्तीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. जानेवारी महिन्यात तत्कालिन पालकमंत्री स्व. अजित पवार हे बीड दौऱ्यावर असतांना त्यांनी मुंबईमधून निघांना मंत्रालयातील अधिकाऱ्यांना दुरध्वनीवरुन या नाट्यगृहाच्या इमारतीकरिता निधी मंजुरीबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या.
ते संभाजीनगर येथून बीडमध्ये पोचहणार असल्याने तोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली तर बरे होईल असे देखील त्यांनी म्हटले होते. त्यांनी सूचना केल्यानंतर तातडीने प्रक्रिया पूर्ण करत अवघ्या अर्धा ते पाऊण तासात या नाट्यगृहाला 8 कोटी 19 लाख 70 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता, तशी माहिती स्व. अजित पवार यांनी त्यावेळी जाहीर कार्यक्रमातून दिली होती. यानंतर त्यांचे अपघातामध्ये निधन झाले. त्यांच्या जागी पालकमंत्रीपद सुनेत्राताई पवार यांनी स्विकारले. ही सर्व घडमोड होऊन आठ महिन्यांपेक्षा अधिकचा काळ लोटला तरी अद्याप बीडच्या नाट्यगृहाच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळालेला नाही. स्व. अजित पवार यांनी घाषणा करुन देखील विलंब लागत असल्याने नाट्यकलावंत व नाट्यप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणीदेखील नाट्यकलावंतांनी केली आहे.
पाठपुरावा करणार : विनोद मुळूक
बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या दुरुस्तीकरिता निधी मंजूर झालेला आहे. निविदेची प्रक्रिया ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. ही प्रक्रिया नगरपालिकेकडे द्यावी अशी मागणी आम्ही यापूर्वी केली होती, तसेच पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे देखील केली होती. परंतु हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातूनच होणार असल्याने त्याकरिता आम्ही पाठपुरावा करू शकतो, निविदा प्रक्रिया आतापर्यंत होणे अपेक्षित होते, परंतु ती झालेली नाही. नाट्यगृहाची दुरवस्था झाल्याने अनेकांकडून तत्काळ दुरुस्तीची मागणी होत आहे, ती पूर्ण करुन घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी दिली.
निधी मंजूर होऊनही कामाला सुरुवात नाही
बीडच्या नाट्यगृहाच्या दुरुस्तीकरिता पाच कोटी रुपयांची मागणी तत्कालिन पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली होती. परंतु दुरुस्तीबरोबरच उच्च दर्जाची साऊंड सिस्टीम या ठिकाणी कार्यान्वीत व्हावी याकरिता स्व. अजित पवार यांनी त्यावेळी आठ कोटी 19 लाख रुपये मंजूर केले होते. अधिकचा निधी मंजूर होऊनही काम मात्र सुरू होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.