

Ambajogai Mamta Rathi Burning Case
गोविंद खरटमोल
अंबाजोगाई : तीन दिवसांपूर्वी अंबाजोगाई शहरालगत घडलेल्या दुर्घटनेचे गूढ अखेर दुर्घटना ग्रस्त झालेल्या प्रा. ममता जखोटीया राठी यांच्या कबुली जबाबानेच उलगडले गेले आहे. येथील एका नामांकित संस्थेतील प्राध्यापिका डॉ. ममता शामसुंदर जखोटिया (राठी) यांनी मानलेला भाऊ धनाजी आर्य यांना आत्महत्येपासून रोखताना अपघाताने मी भाजले, असे आपल्या जबाबातून स्पष्ट केले आहे.
त्यामुळे या दुर्घटनेबाबतीत सुरु असलेल्या घातपाताच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, ममता राठी यांच्यावर लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अतिचिंताजनक आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, डॉ. ममता राठी (रा. पिताजी माउली नगरी, अंबाजोगाई) या अंबाजोगाई येथील एका नामांकित महाविद्यालयात वाणिज्य विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. ४ जानेवारी रोजी त्यांचे सहकारी आणि मानलेले भाऊ धनाजी आर्य यांनी त्यांना फोन करून कॉलेजमधील राजकारणामुळे आपल्याला मोठा त्रास होत असल्याने आता जगण्याची इच्छा उरली नसल्याचे सांगितले. भावाचा जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच ममता यांनी तात्काळ जवळगाव फाटा गाठला. त्या ठिकाणी धनाजी आर्य हे हातात डिझेलची बाटली घेऊन स्वतःला संपवण्याच्या तयारीत होते
धनाजी आर्य स्वतःच्या अंगावर डिझेल ओतत असताना ममता यांनी धाडसाने त्यांच्या हातातील बाटली हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत बाटलीतील डिझेल ममता यांच्या अंगावर सांडले. ममता यांनी धनाजीच्या हातातील काडीपेटी देखील फेकून दिली, त्याच वेळी त्यांच्या कोटाला अचानक आग लागली. नंतर या आगीत अंगालाही धग लागल्याने ममता राठी या गंभीररीत्या भाजल्या गेल्या.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि धनाजी आर्य यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि ममता यांना तातडीने उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात हलवले असे त्यांनी बर्दापूर पोलिसांना दिलेल्या जबाबात सविस्तर कथन केले आहे. सध्या ममता राठी यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून ८० टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती अतिचिंताजनक आहे.
प्रा. ममता राठी या उच्च विद्याविभूषित असून त्यांनी वाणिज्य विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. सहजसोप्या भाषेत विषय समजाविण्यात त्यांचा हातखंडा आहे. प्रा. राठी यांचे स्वतःचे युट्युब चॅनल असून त्याद्वारे त्या विद्यार्थ्यांसाठी नियमित शैक्षणिक मार्गदर्शनपर व्हिडीओ पोस्ट करतात. या चॅनलला हजारो फॉलोअर्स देखील आहेत. महाविद्यालयातील इतरही अनेक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. मानलेल्या भावाचा बचाव करताना विद्यार्थीप्रिय प्राध्यापिकेच्या जीवावर बेतणारा असा प्रसंग अपघाताने ओढवल्याने शहरातील शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.