

Ambajogai Loan Repayment Dispute
केज : ट्रॅक्टरसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्याची मागणी केल्याचा राग आल्याने कर्जदाराने आपल्या जामीनदारावर थेट विळ्याने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील अंजनपूर येथील अशोक साहेबराव देशमुख व त्यांचे वडील साहेबराव देशमुख हे हनुमंत नामदेव जाधव व विकास हनुमंत जाधव यांच्या ट्रॅक्टर कर्जासाठी जामीनदार आहेत. कर्जासाठी त्यांनी त्यांच्या शेताचे ७/१२ व ८-अ उतारे बँकेकडे दिले होते. मात्र, ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर सन २०२२ पासून आरोपींकडून कर्जाचे हप्ते नियमितपणे भरले जात नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, अशोक देशमुख यांचा ऊस रांजणी येथील नॅचरल शुगर कारखान्यात गेला होता. ऊसाचे पैसे खात्यावर जमा झाले असतानाही, ट्रॅक्टर कर्जासाठी ते जामीनदार असल्यामुळे बँकेने अशोक देशमुख यांचे खाते लॉक केले. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.
दि. २७ जानेवारी रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास अशोक देशमुख हे शेताकडे जात असताना त्रिंबक व्यंकट भोसले यांच्या शेताजवळ रस्त्यावर त्यांची भेट हनुमंत नामदेव जाधव व विकास हनुमंत जाधव यांच्याशी झाली. यावेळी अशोक देशमुख यांनी कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे उसाचे पैसे अडवल्याची बाब सांगितली व पैशांची गरज असल्याचे नमूद केले. मात्र, विकास जाधव याने पैसे भरण्यास नकार देत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हनुमंत नामदेव जाधव याने हातातील विळ्याने अशोक देशमुख यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर वार करून त्यांना जखमी केले.
या प्रकरणी अशोक देशमुख यांच्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात हनुमंत नामदेव जाधव व विकास हनुमंत जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण मोरे करीत आहेत.