

Beed Ahilyanagar Road Car Fire Accident
केज/आष्टी/बीड : आष्टी तालुक्यातील अंमळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बीड अहिल्यानगर महामार्गावर कापसी फाट्याजवळ शुक्रवारी (दि.२७) सकाळी ११ वाजता काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. एक हायवा टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण धडकेनंतर कारने अचानक पेट घेतला. या आगीत कीर्तनकार ह.भ.प. श्रीहरी महाराज पुरी यांची पत्नी आणि मुलगा यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. आग लागल्या नंतर दोघा माय-लेकरांनी कारमधून बाहेर पडण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न केला. परंतु ते सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
आष्टी तालुक्यातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि ग्रामपंचायत अधिकारी असलेले ह.भ.प. श्रीहरी महाराज पुरी (रा. साळेगाव ता. केज) यांची पत्नी सौ. पुष्पा श्रीहरी पुरी वय (४७ वर्ष) आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी हे शुक्रवार, दि. २७ मार्च रोजी आष्टी येथून अहिल्यानगर-बीड या रस्त्याने त्यांची कार क्र. (एम एच-१६/बी वाय-३८३९) बीड कडून बीडकडे जात होते. त्यांची कार धामणगाव पासून पुढे जात असताना कापशी फाट्या जवळ समोरून भरधाव वेगात येत असलेल्या हायवा टिप्पर क्र. (एम एच-१६/सी डी-७३०५) ने जोराची धडक दिली.
हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात कारचा चकनाचूर झाला आणि कारने पेट घेतला. आग एवढी भीषण होती की, या आगीत कीर्तनकार ह.भ.प. श्रीहरी महाराज पुरी यांची पत्नी सौ. पुष्पा श्रीहरी पुरी वय (४७ वर्ष) आणि त्यांचा सी ए असलेला मुलगा चि. ऋषिकेश श्रीहरी पुरी वय (२८वर्ष) यांचा जागीच जळून कोळसा झाला. अपघातातील मयत आई आणि मुलांवर त्यांच्या मूळगावी साळेगाव ता. केज येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
अपघात झाल्या नंतर त्या ठिकाणी असलेले गावकरी आणि शेतकरी यांनी आग विझविण्याचा आणि आतील जखमी माय-लेकरांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र ते सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
अपघातातील जखमी माय लेक आगीत जळत असताना त्यांनी जीव वाचविण्यासाठी जीवाच्या आकांताने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा तडफडून दुर्दैवी मृत्यू झाला.
ज्यावेळी या मायलेकरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला त्यावेळी हभप श्रीहरी महाराज पुरी यांचे कडा येथून जवळच असलेल्या केरूळ येथील अखंड सप्ताहात काल्याचे कीर्तन सुरू होते. कीर्तन सुरू असताना त्यांना अनेकांचे फोन आले म्हणून त्यांनी माईक बंद करून फोन उचलला आणि त्यांना ही दुर्दैवी बातमी समजली.
जिथे अपघात झाला त्या ठिकाणी शेतकरी मिठू गोल्हार यांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच पाण्याची मोटार सुरू करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना वाचवू शकले नाहीत. मृत्यू पावलेले माय लेक शेवट पर्यंत आगीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, त्यांना यश आले नाही, अशी माहिती अपघातस्थळा वरून मिठू गोल्हार यांच्या पत्नी मनिषा गोल्हार यांनी माहिती दिली आहे.
अपघातात दुर्दैवी मृत्यू आलेल्या पुष्पा पुरी आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश या दोघा मायलेकांवर एकत्रच अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे.