Beed accident news | मृत्यूच्या दारात धावून आले 'देवदूत'! केज-मांजरसुंबा रोडवर 'दी बर्निंग बस'मधून २० प्रवाशांची सुरक्षित सुटका

बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली आणि घर्षणामुळे व शॉर्ट सर्किटमुळे बसने तत्काळ पेट घेतला
Beed accident news | मृत्यूच्या दारात धावून आले 'देवदूत'! केज-मांजरसुंबा रोडवर 'दी बर्निंग बस'मधून २० प्रवाशांची सुरक्षित सुटका
Published on
Updated on

केज : मध्यरात्रीची वेळ... धडधड पेटणारी बस, अन् अडकलेले प्रवासी! अशा काळजाचा ठोका चुकवणाऱ्या परिस्थितीत पाच रुग्णवाहिका चालक आणि डॉक्टरांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे केज-मांजरसुंबा रोडवर सोमवारी मध्यरात्री मोठी जीवितहानी टळली. 'माणसाच्या रूपातील या देवदूतांनी' स्वतःचा जीव धोक्यात घालून २० प्रवाशांना आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापूर्वी सुखरूप बाहेर काढले.

नेमकी घटना काय?

सोमवार, १६ मार्च रोजी मध्यरात्री २:३० वाजेच्या सुमारास जळगावहून लातूरकडे जाणारी एक खासगी लक्झरी बस केज-मांजरसुंबा रोडवरील सांगवी-सारणी वळणावर आली असता, चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली आणि घर्षणामुळे व शॉर्ट सर्किटमुळे बसने तत्काळ पेट घेतला.

अन् देवदूत धावून आले...

अपघाताची माहिती मिळताच '१०८' रुग्णवाहिकेचे पथक अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. बसने पेट घेतलेला असतानाही आकाश चाळक, दत्ता घोळवे, मकरंद घुले, प्रशांत नेहरकर, उमेश हंगे आणि नेकनूरचे पायलट गिरी आणि डॉ. सहदेव घुले यांनी मदतीसाठी धाव घेतली.

स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले प्राण

बस पलटी झाल्यामुळे प्रवासी आत अडकले होते. वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे आग वेगाने पसरत होती. मात्र, या बहाद्दर तरुणांनी आगीची तमा न बाळगता बसमध्ये अडकलेल्या २० जखमी प्रवाशांना सुखरूप बाहेर ओढून काढले. या सर्वांना तातडीने रुग्णवाहिकेमध्ये हलवून प्रथमोपचार देण्यात आले. जर ही मदत काही सेकंद उशिरा पोहोचली असती, तर 'दी बर्निंग बस'मध्ये अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असता. "वेळेवर मदत मिळाली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. या तरुणांचे कार्य हे एखाद्या देवदूतापेक्षाही श्रेष्ठ आहे," अशा भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news