

Ban on Selling Petrol and Diesel in Bottles
गेवराई, पुढारी वृत्तसेवा : आखाती देशातील तणावपूर्ण युद्धपरिस्थितीमुळे संभाव्य इंधनटंचाईची भीती निर्माण झाल्याने गेवराई तालुक्यात पेट्रोल व डिझेलसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी नागरिकांकडून इंधनाचा साठा करण्यासाठी कॅन व बाटल्यांमध्ये पेट्रोल-डिझेल भरून घेण्याचे प्रकार वाढले असून, ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्स यांनी कडक निर्देश जारी करत सर्व पेट्रोल पंप चालकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल देऊ नये. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर शासन नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इश ाराही प्रशासनाने दिला आहे.
मात्र, प्रशासनाच्या आदेशाची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र गेवराई तालुक्यात दिसून येत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर अजूनही उघडपणे कॅन व बाटल्यांमध्ये इंधन विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत पंप चालकांकडे विचारणा केली असता, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी इंधन दिले जाते, असे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्स व जिल्हा पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या आदेशानुसार, सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा प्रकारे बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल देणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारे विक्री करणाऱ्या पंप चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे नायब तहसीलदार पुरवठा गजानन मोरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्स यांचे स्पष्ट आदेश असतानाही काही पेट्रोल पंपांवर काळाबाजार सुरू आहे. शेतकरी बाजूला राहतो आणि इतर व्यक्ती बाटली व कॅनमध्ये इंधन भरून नेत आहेत. असे प्रकार आढळल्यास वंचित आघाडीच्या वतीने संबंधित पंपांवर कारवाईसाठी शासनाला भाग पाडू असे पप्पु गायकवाड यांनी सांगितले.