

Bail Pola Celebrated Despite the Shadow of Drought
बीड, पुढारी वृत्तसेवा : यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. परंतु वर्षातील शेतकऱ्यासोबत शेतामध्ये काबाड कष्ट करणाऱ्या बैलांचा महत्त्वाचा सण म्हणून पोळा ओळखला जातो. आज हा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सजलेल्या बैलजोड्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते तर अगदी पोळ्यादिवशी देखील शेतकऱ्यांनी बैलाच्या अंगावर 'सरकार मायबाप, दुष्काळ जाहीर करा' अशी मागणी लिहील्याचे पहायला मिळाले.
माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे शेतकरी बांधवांचा पारंपरिक पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतीच्या कामात शेतकऱ्याला साथ देणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलजोड्यांना आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. रंगीबेरंगी सजावट, गळ्यातील घुंगरांचा निनाद आणि ग्रामस्थांचा उत्साह यामुळे गावात दिवसभर पोळ्याची धूम पाहायला मिळाली.
पोळ्यानिमित्त सकाळपासूनच गावात लगबग सुरू होती. शेतकऱ्यांनी बैलांना अंघोळ घालून स्वच्छता केली. त्यानंतर शिंगांना विविध रंग लावून गळ्यात घुंगरांच्या माळा, घंटा, रंगीत दोर तसेच अंगावर नक्षीदार झूल चढविण्यात आली. सजविलेल्या बैलजोड्या गावातील रस्त्यांवरून जात असताना त्यांना पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत होती.
शेतकरी कुटुंबांनी घरासमोर बैलांची विधिवत पूजा केली. कपाळावर हळद-कुंकू लावून औक्षण करण्यात आले. पुरणपोळी, गोडधोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून बैलांच्या आरोग्यासह शेतीला भरघोस उत्पन्न मिळावे आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना करण्यात आली. पूजेनंतर सजविलेल्या बैलजोड्यांना गावातील प्रमुख रस्त्यांवरून फिरविण्यात आले. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजुळ नाद आणि आकर्षक सजावटीमुळे गावातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. लहान मुलांसह महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनीही या पारंपरिक सोहळ्याचा आनंद घेतला.
याबरोबरच आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी उत्साहात पोळा साजरा करण्यात आला. 'अद्वैतचंद्र' निवासस्थानी गुरुवारी (दि. 10 सप्टेंबर) सर्जा-राजाचे विधिवत पूजन व औक्षण करून बैलपोळा सण पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी युवा नेते जयदत्त धस, सागर धस यांच्यासह धस कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी सर्जा-राजाला स्नान घालून आकर्षक सजावट करण्यात आली.
त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी विधिवत पूजा व औक्षण करून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते तसेच ग्रामीण जीवनातील बैलांचे महत्त्व यावेळी अधोरेखित झाले. माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आपल्या निवासस्थानी बैल पोळा सण साजरा करण्यात आला. यावेळी धोंडे कुटूंबीयांनी बैलांचे पुजन केले.
धारूर येथे परंपरेनुसार पेठ विभागातील पोळ्याचा मान प्रमोदकुमार शरदकुमार तिवारी, कृष्णा महाजन व शेटे कुटुंबीयांकडे, तर कसबा विभागातील पोळ्याचा मान बालासाहेब मुकदम शिनगारे, अश्रुबा शिनगारे, गणेश देशपांडे व काटे कुटुंबीयांकडे होता. मानाच्या बैलांचे पूजन झाल्यानंतर ढोल-ताशांच्या तालावर मिरवणुकीला सुरूवात झाली.