

शरद रेडेकर
आष्टी ः आष्टी तालुक्यात यंदा गावरान कांद्याच्या लागवडीने मोठी भरारी घेतली असून, तब्बल 30 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर विक्रमी लागवड झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. समाधानकारक पावसामुळे जलसाठ्यात झालेली वाढ आणि गावरान कांद्यातून मिळणारे नगदी उत्पन्न लक्षात घेता, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गावरान वाणाला पसंती दिली आहे.
गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे तालुक्यातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. कांदा पिकासाठी पोषक असलेले हवामान सध्या उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे. विशेषतः खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर, रब्बी हंगामात कांदा पीक कष्टाचे चीज करेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
बीड सांगवी येथील प्रगतशील शेतकरी शहादेव नरवडे यांनी सांगितले की, यंदा पाण्याची सोय चांगली असल्याने आम्ही गावरान कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. बाजारभाव स्थिर राहिले, तर यावर्षी कांदा पीक आमच्या कष्टाचे चीज करेल.सध्या तालुक्यात सर्वत्र एकाच वेळी कांदा लागवड सुरू असल्याने मजुरांची मोठी टंचाई जाणवत आहे. अनेक ठिकाणी शेतकरी कुटुंबासह स्वतः शेतात राबत असून, काही भागांत बाहेरील जिल्ह्यांतून मजूर आणले जात आहेत.
‘कांदा लावणी’मुळे ग्रामीण भागात मोठी लगबग पाहायला मिळत आहे.गावरान कांदा दीर्घकाळ साठवणुकीस योग्य असल्याने शेतकऱ्यांना बाजारभाव वाढेपर्यंत तो साठवून ठेवता येतो. चवीला तिखट, दर्जेदार आणि टिकाऊ असल्यामुळे ग्राहकांकडून या कांद्याला मोठी मागणी असते. इतर संकरित वाणांच्या तुलनेत गावरान कांद्याला बाजारपेठेत नेहमीच दोन पैसे जास्त दर मिळतो.याबाबत माहिती देताना तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे म्हणाले, तालुक्यात यंदा गावरान कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे.
शेतकऱ्यांनी लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी शासनाकडून उपलब्ध असलेल्या कांदा लागवड यंत्र अनुदानाचा लाभ घ्यावा. तसेच करपा व इतर रोगांपासून संरक्षणासाठी वेळोवेळी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा उपयोग करावा. एकूणच यंदाचा कांदा हंगाम शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुबत्तेचा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.