

Ambhora police solve murder case within six hours
कडा, पुढारी वृत्तसेवा : आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा शिवारात आढळलेल्या अनोळखी तरुणाच्या खुनाचा अंभोरा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत दोन आरोपींना जेरबंद केले. तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत ही कारवाई करून आरोपी संदीप लल्लू सोनखर (वय २१) आणि भागवत जालिंदर आरे (वय २८), दोघेही रा. शिक्रापूर, जि. पुणे, यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
२५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पिंपरी घाटा शिवारात बीड-अहिल्यानगर महामार्गालगत घाटामध्ये अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्रथमदर्शनी हा प्रकार घातपाताचा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली.
पोलिसांनी मृताची ओळख पटवली. त्यानंतर मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून दि. २६ सप्टेंबर रोजी खून आणि पुरावा नष्ट केल्या प्रकरणी संदीप लल्लू सोनखर (वय २१) आणि भागवत जालिंदर आरे (वय २८), यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी कोण आणि खुनामागील नेमके कारण काय, याबाबत सुरुवातीला पोलिसांकडे ठोस माहिती नव्हती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शना-खाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांच्या नेतृत्वाखाली अंभोरा पोलिसांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाताळली. गुन्ह्याचा पुढील तपास स. पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे करीत आहेत.
गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय बातमी-दारांच्या माध्यमातून संशयितांचा माग काढण्यात आला. तपासा दरम्यान मिळालेल्या धाग्यांचा मागोवा घेत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार ते सहा तासांत आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. कोणताही ठोस धागा नसताना तपासाला दिशा देत आरोपींपर्यंत पोहोचल्याने अंभोरा पोलिसांची ही कारवाई 'सुता-वरून स्वर्ग गाठला' अशी ठरली आहे.