

बीड ः डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यातील हलगर्जीपणा तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे नगरपालिका प्रशासनावर टीका होत आहे. तर दुसरीकडे आता मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी या प्रकरणात संबंधीत विभागाच्या प्रमुखांकडून खुलासा मागवत त्याबाबतचा अहवाल नगरविकास विभागाच्या संचालकांकडे पाठवला आहे. तर या प्रकरणात बांधकाम विभागाचे अभियंता देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहराच्या विविध भागातील मिरवणूका डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जात असतात. या मार्गावरील रस्त्यावर असलेले खड्डे बुजवणे, मिरवणूक मार्गावर कसल्याही प्रकारची अस्वच्छता राहणार नाही याबाबतची काळजी घेण्याच्या सूचना मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी संबंधीत विभागाच्या प्रमुखांना केल्या होत्या. तसेच फडसे हे स्वतः या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात विशेष लक्ष देत त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. परंतु रस्त्यावरील खड्डे बुजवतांना बांधकाम विभागाचे अभियंता देशमुख यांच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मिरवणूक मार्गावरील खड्डे मुरुमाऐवजी चक्क कचखडीने भरण्यात आले. यामुळे या कचखडीवरुन दुचाकी घसरून अनेकजण जखमी झाले. यामुळे संताप व्यक्त केला जात होता.
तर दुसरीकडे तारा पान सेंटरजवळ पाणी तुंबल्याने मिरवणूकीला तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्यांना पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ आली. या भागात पाणी सोडण्यात आले होते, परंतु पाणी वाहून जाण्याऐवजी नालीमध्ये घाण साचल्याने ते रस्त्यावर तुंबल्याने ही परिस्थिती निर्माण झाली होती. या तिन्ही प्रकरणात बांधकाम विभागाचे अभियंता देशमुख, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता माने व स्वच्छता विभागाचे प्रमुख गणेश पगारे यांचा हलगर्जीपणा समोर आला होता.
चौकशीची मागणी झाल्यानंतर मुख्याधिकारी फडसे यांनी खुलासा मागवला होता. त्या तिघांनी खुलासा सादर केल्यानंतर फडसे यांनी आपल्या अभिप्रायासह हा अहवाल नगरविकास विभागाच्या संचालकांना पाठवला असून ते लवकरच याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.अभियंता देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी फडसे यांनी दिली.
शिवाजी महाराज चौक ते नगरपालिका रस्ता होणार
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरपालिका या दरम्यानचा थोड्या अंतराचा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने तसेच पाणी साचत असल्याने याच्या दुरुस्तीची मागणी केली जात होती. परंतु न्यायालयीन प्रकरणामुळे रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागत नव्हता. याच मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी कचखडी टाकल्याने अनेकांचे अपघातही झाले होते. अखेर आता या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर निघणार असून प्रत्यक्ष कामाला देखील लवकरच सुरुवात होईल अशी माहिती मुख्याधिकारी फडसे यांनी दिली.
विभागीय चौकशी की निलंबन?
बीड नगर परिषदेच्या पाणीपुरवठा, स्वच्छता व बांधकाम विभागाच्या प्रमुखांकडून झालेल्या हलगर्जीपणामुळे जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ नगरपालिका प्रशासनावर आली. याची गंभीर दखल घेत त्यांच्याडून खुलासा मागवण्यात आला होता. या खुलाशावर मुख्याधिकारी फडसे यांनी आपल्या अभिप्रायासह अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे. त्यावर आता वरिष्ठ या तिन्ही कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी करतात की निलंबीत करुन चौकशी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.