बीड : महाराष्ट्राचे राजकारण जरा वेगळे आहे. १९८५ पासून जर आपण पाहिलं तर कुठल्याही एका पक्षाचे स्वबळावर सरकार येऊ शकलेले नाही. आगामी काळातही हे चित्र राहील. परंतु तरीही आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी (दि.१) यांनी व्यक्त केले.
परळी येथे जन सन्मान यात्रेची सभा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती.
मुंबई येथे भाजपच्या बैठकीदरम्यान अमित शहा यांनी २०१९ मध्ये स्वबळावर सत्ता आणायची असे म्हटले होते. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. आम्ही देखील आमच्या पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करत असतो. परंतु, महाराष्ट्राचे राजकारण आपण जर बारकाईने पाहिले तर १९८५ पासून आजपर्यंत कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर सरकार स्थापन करता आलेले नाही. आगामी काळातही असेच चित्र राहील, असे मला वाटते. परंतु पक्षाच्या बैठकामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी असं बोलावं लागतं, असं देखील अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.