पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महायुतीबाबत महत्त्वपूर्ण दावा केला आहे. त्यांच्या विधानाने महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
"पाणी पुरवठा खात्याची मंजुरीसाठी अर्थ खात्याकडे फाईल पाठवली पण ती फाईल दहा वेळा परत आली, हे अर्थ खात नालायक आहे. फाईल परत आली पण मी पाठपुरावा करायचा सोडला नाही", अशा शब्दांमध्ये जळगाव येथील एका कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी अर्थ खात्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली हाेती. याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "अजितदादांच्या खात्याला नालायक म्हणणं हे धक्कादायक आहे. अजित पवार गटाला महायुतीतून बाहेर काढण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरु आहेत."
जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियात चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार का? अजित पवार यांची भूमिका काय असणार आहे? याकडे लक्ष लागून राहीले आहे.