शरद पवार की अजित पवार? कार्यकर्त्यांची घालमेल

‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’
Maharashtra assembly election
शरद पवार, अजित पवारPudhari Photo
Published on
Updated on
हरिष पाटणे

सातारा : विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच सातारा जिल्ह्याच्या कट्टर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. ‘शरद पवार आमचे दैवत आहेत, ते आमचे श्रद्धास्थान आहेत,’ असा हाकारा करत जिल्ह्यातील पहिल्या व दुसर्‍या फळीचे नेते एकीकडे शरद पवारांविषयी आत्मीयता दाखवत आहेत, तर दुसरीकडे विकासासाठी, दिल्या शब्दाला जागण्यासाठी अजित पवारांसोबत जावे लागत आहे, असे सांगताना दिसत आहेत. कधी नव्हे ती सातारा जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची ही उद्विग्नता प्रकर्षाने समोर आली आहे. ‘धरलं तर चावतंय सोडलं, तर पळतंय’ अशीच ही अवस्था असून, त्यातून अनेक राजकीय विस्फोट होण्याचे संकेत आहेत.

Maharashtra assembly election
सातारा कुणाचा? शरद पवार की फडणवीस-शिंदे यांचा ?

मूळत:, सातारा जिल्ह्यावर थोरल्या पवारांचीच कमांड. लक्ष्मणराव पाटील, अभयसिंहराजे भोसले, भाऊसाहेब गुदगे, मदनआप्पा पिसाळ, पी. डी. पाटील, भि. दा. भिलारे, बाळासाहेब भिलारे, सदाशिवराव पोळ, धोंडिराम वाघमारे, विलासराव पाटील-वाठारकर, दादाराजे खर्डेकर, लालसिंगराव शिंदे अशा दिवंगत नेत्यांनी शरद पवारांची प्रदीर्घ काळ साथ-संगत केली. या राजकीय नेत्यांच्या हयातीतच शरद पवारांनी सातारा जिल्ह्याची सूत्रे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्याकडेही दिली होती. शरद पवार व अजित पवार यांच्या एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढच्या काळात रामराजे ना. निंबाळकर, श्रीनिवास पाटील, विक्रमसिंह पाटणकर, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे या नेत्यांनी दोन्ही पवारांना सोबत केली आणि सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व पुढे नेले. याच कालावधीत उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, शालिनीताई पाटील यांनी दोन्ही पवारांची साथ सोडली.

राज्यात झालेल्या फुटाफुटीत व वाटाघाटीत सातारा जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही शकले झाली. काहीजण शरद पवारांच्या गोटात राहिले, तर काहीजण अजित पवारांकडे गेले. लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात शरद पवारांचा स्ट्राईक रेट मोठा दिसला. विकासाच्या मुद्द्यावर अजित पवारांकडे गेलेल्या अनेकजणांना आता शरद पवार प्रेमाचा उमाळा आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे दोन पक्ष स्वतंत्र असताना दोन्ही पक्षांचे वाद न्यायालयात सुरू असताना शरद पवार गटात गेलेले व अजित पवार गटात गेलेले कार्यकर्ते जाहीर भाषणांमध्ये सभा, समारंभांमध्ये दोघांच्याही नावाचा पुकारा करत आहेत. गेल्या आठवड्यात अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष असलेले अमित कदम जाहीरपणे शरद पवारांना भेटले आणि त्यांनी शरद पवार गटातून तिकीटाची मागणी केली.

सध्या अजित पवार गटात असलेले नेते विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. मकरंद पाटील, राज्यसभेचे खा. नितीनकाका पाटील, आ. दीपक चव्हाण, माजी जि.प. अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, मुंबई बाजार समितीचे माजी चेअरमन बाळासाहेब सोळस्कर ही अजित पवार गटात असलेली मातब्बर मंडळी आपल्या राजकीय भाषणांमध्ये अर्धे भाषण शरद पवारांवर करताना दिसत आहेत. ‘शरद पवार हे आपले श्रध्दास्थान आहेत. तरीपण मी अजित पवारांसोबत आहे’, अशीही राजकीय भाषा आहे. त्याचा परिणाम कार्यकर्त्यांच्या अस्वस्थतेमध्ये आहे. शरद पवारांनी सातारा जिल्ह्यातील 8 पैकी 7 विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. त्यांच्याकडे या सातही मतदारसंघात इच्छुकांची रांग आहे. अशा परिस्थितीत अजित पवार गटात असलेले नेते मात्र मागच्या पाऊंडावर दिसत आहेत. शरद पवारांसोबत जायची तर इच्छा आहे पण अजितदादांना शब्द देवून बसलोय, अशी अवस्था काही मतदारसंघात आहे तर शरद पवारांच्या विरोधात बोललो तर मताला झटका बसणार म्हणून भाषणांमध्ये त्यांचे नाव घेवून विरोध मावळण्याचा प्रयत्न काही मतदारसंघात सुरू आहे. त्यातून अजित पवार गटाशी पूर्ण निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांमध्येही चलबिचल सुरू आहे.

नेतेच जर भूमिकेवर ठाम नसतील तर कार्यकर्त्यांनी कुणाकडे पहायचे? निवडणूक तोंडावर आली असताना प्रबळ नेतेमंडळी दोन्ही डगरींवर हात ठेवून असतील तर अजितदादांच्या गटासाठी ही धोक्याची घंटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची शकले झाल्यानंतर अगोदरच गावोगावची राष्ट्रवादी दोन गटात विभागली आहे. त्यातच आता कोणासोबत रहायचे यावरून माईंडगेम सुरू असल्याने कार्यकर्त्याला नेत्यांच्या बुध्दीचा सुगावा लागेना. त्यातून अस्वस्थ कार्यकर्ता कोणता झेंडा घेवू हाती या विवंचनेत आहे. भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट, काँग्रेसची मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा अंतर्गत कलगीतुरा व सुरू असलेला माईंडगेम गमतीने एन्जॉय करत आहेत.

Maharashtra assembly election
इंदापुरात शरद पवार-हर्षवर्धन पाटील यांचा एकत्रित बॅनर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news