

Abhiwadan rally on the occasion of Savitribai Phule's birth anniversary.
बीड, पुढारी वृत्तसेवा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीमाई फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड यांच्या वतीने शनिवारी शहरात आयोजित करण्यात आलेली भव्य अभिवादन रॅली व अभिवादन सभा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर अभिवादन रॅलीस सुरुवात झाली. ही रॅली माळीवेस मार्गे सावित्रीमाई फुले चौक, क्रांतीया ज्योतिबा फुले-राजमाता अहिल्या माता होळकर चौक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक असा मार्गक्रमण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे सांगता झाली.
रॅलीदरम्यान मार्गावरील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या रॅलीत महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. जय ज्योती, जय क्रांती या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
रॅलीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, ओबीसी परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संदीप उपरे, राष्ट्रीय कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. राम गायकवाड, अण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उत्तम पवार तसेच यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
अभिवादन सभेत मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर मार्गदर्शनपर विचार मांडले तसेच स्त्री शिक्षण, समानता व सामाजिक न्यायाचा संदेश दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य तसेच सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित गीत हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
सभेच्या समारोपानंतर तुलसी शैक्षणिक समूह, बीड यांच्या वतीने उपस्थितांना अल्प-ोपहार देण्यात आला. या सभेचे प्रास्ताविक प्रा. राम गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अंकुश कोरडे यांनी केले, तर आभार डॉ. विकास वाघमारे यांनी मानले. या कार्यक्रमात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शालेय शिक्षक, विद्यार्थी व नागरिके सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.