

A widow was raped after being lured with the promise of marriage
केज, पुढारी वृत्तसेवा केज तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून एका विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर व खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून संबंधित तरुणाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.
पीडित महिलेचे सुमारे १३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला दोन अपत्ये असून सात वर्षांपूर्वी अपघातात पतीचे निधन झाले. त्यानंतर ती दोन मुलांसह केज तालुक्यातील सासरी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होती. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी तिची इन्स्टाग्रामवरून रमाकांत तांदळे (वय ३०, अविवाहित) या तरुणाशी ओळख झाली.
या ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाख वून वेळोवेळी सहमतीने शारीरिक संबंध ठेवले. मात्र, १४ ऑगस्ट २०२५ रोजी आरोपीने पीडित महिलेला अंधारात ठेवून दुसऱ्या तरुणीशी गुपचूप विवाह केल्याचे समोर आले आहे.
त्यानंतरही ३१ डिसेंबर २०२५ रोजी पीडित महिला घरात एकटी असताना आरोपीने जबरदस्तीने घरात प्रवेश करून तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी रमाकांत तांदळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (१), ११५(२), ३३३, ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक प्रकाश शेळके करीत असून आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस पथके शोध घेत आहेत.