

A young woman from Massajog ended her life in Rahimatpur
कोरेगाव : पुढारी वृत्तसेवा
रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील क्वार्टरमध्ये राहणाऱ्या तेजस्विनी रामहरी तांदळे (२३) या युवतीने बेडरूममधील खिडकीच्या गजाला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. तेजस्विनी मूळची मस्साजोग (ता. केज, जि. बीड) येथील आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायक म्हणून कार्यरत असणारे तिचे वडील रामहरी (मूळ रा. मस्साजोग) यांनी रहिमतपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायक म्हणून कार्यरत असणारे रामहरी नागनाथ तांदळे हे मुळचे बीड जिल्ह्यातील कोरेगाव (पो. मस्साजोग) येथील आहेत. ते पत्नी सुवर्णा तांदळे व जर्नालिझम केलेली मुलगी तेजस्विनी असे एकत्रीत रहिमतपूरच्या आरोग्य केंद्रातील क्वार्टरमध्ये राहात आहेत. शुक्रवारी रात्री तिघे जेवण करून झोपले. पहाटे ४ वाजता पाण्याची मोटार सुरू करावयाची असल्याने त्यांनी बेडरूममध्ये झोपलेल्या तेजस्विनीला आवाज दिला. त्यावेळी लाईट नसल्याने पुन्हा तेही झोपले. त्यानंतर सकाळी ६ वाजता दरवाजा वाजवला, मोबाईल फोनवरती फोन केला मात्र तेजस्विनीने फोन उचलला नाही. वारंवार फोन करूनही तेजस्विनी फोन उचलत नसल्याने घाबरून बेडरूमचा दरवाजा तोडला.
बेडरूममध्ये प्रवेश केला तेव्हा पाहिले असता तेजस्विनी हिने खिडकीच्या गजाला ओढणी बांधुन गळफास घेतल्याचे दिसले. आरोग्य केंद्राचे डॉ. महेश बोले यांना घटनेची माहिती देण्यात आली. मृत तेजस्विनीचे शवविच्छेदन केल्यानंतर तिचा मृतदेह मूळ गावी मस्साजोग, जि. बीड येथे नेण्यात आला. तपास हवालदार जयवंतराव पवार करत आहेत.
नेमके घडले तरी काय ?
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर उठलेला गुन्हेगारीचा वनवा अख्ख्या महाराष्ट्रात धुमसत आहे. बीड जिल्ह्यातीलच डॉक्टर युवतीने फलटण येथे आत्महत्या केल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. त्यानंतर आता बीडच्या मस्साजोग येथीलच युवतीने रहिमतपूरच्या आरोग्य केंद्रात आत्महत्या केल्याने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. मृत तेजस्विनीने जर्नालिझमची पदवी पूर्ण करून पुढील एमएसची तयारी सुरू होती. असे असताना तिने अचानक आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी नेमकं काय घडले की अवघ्या २३ व्या वर्षीच आत्महत्या करावी लागली याचा उलघडा डीवायएसपी राजश्री तेरणी पाटील यांनी करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.