

Annasaheb Patil Arthik Vikas Yojana Scam In Beed
बीड, पुढारी वृत्तसेवा :
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ मिळवून देतो असे म्हणत तरुणांची फसवणूक करणारे रॅकेट बीडमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या घटली असल्याचा दावा मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बीडमध्ये आढावा बैठक घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना नरेंद्र पाटील यांनी बीडमध्ये गेल्या पाच वर्षात अवघ्या चार हजार युवकांना व्याज परतावा योजनेचा लाभ मिळल्याचे सांगितले. प्रत्यक्षात दहा हजार जणांनी अर्ज केले होते, परंतु त्यांचा या योजनेत समावेश होऊ शकला नाही.
कारण त्यांच्या प्रस्तावामध्ये काही त्रुटी होत्या, काही कागदपत्र चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलेली होती. याला कारण या पाठीमागे असलेले रॅकेटच असून ते चुकीची कागदपत्र सादर करत असल्याने तरुणांना व्यवसाय करण्यासाठी मदत मिळू शकत नाही. असे प्रकार होऊ नयेत, तसेच तरुणांना आर्थिक मदत वेळेत व्हावी याकरिता आम्ही बीडमध्ये उपविभागीय कार्यालय सुरु करत आहोत. या ठिकाणी लातूर, धाराशिव, परभणी या ठिकाणच्या मराठा तरुणांचे प्रस्ताव देखील गतीने मार्गी लावले जाऊ शकतील अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय चांगल्या ठिकाणी, प्रशस्त जागेत असावे याकरिता आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा केला. परंतु त्याला मंजुरी मिळत नसल्याची खंत नरेंद्र पाटील यांनी सांगितली. यामुळे आता अण्णासाहेब पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यालयाचा किराया दिला जाणार असून बीडमध्ये शाहूनगर भागात हे कार्यालय लवकरच सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.