

केज :- फुकट तंबाखू का देत नाहीस ? म्हणून एकाने ८२ वर्ष वयाच्या वृद्ध तंबाखू विक्रेत्याला लाथा घालून मारहाण केली. या मारहाणीत वृद्ध इसम जखमी झाला असून त्याच्या बरगडीचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील मस्साजोग येथील शिवाजी निवृत्ती देशमुख हे तंबाखू विक्रीचा व्यवसाय करतात. दि. २ जून रोजी ते मस्साजोग येथे बाजार तळावर मुंज्याचा पार या ठिकाणी बसून तंबाखू विक्री करीत असताना सुनील विष्णू भालेराव तेथे आला आणि बिगर पैशाने तंबाखू दे असे म्हणाला. त्यावर शिवाजी देशमुख याने त्यास फुकट तंबाखू देण्यास नकार दिला. म्हणून सुनील भालेराव याने शिवाजी देशमुख यांना पाठीत आणि छातीत लाथाने मारहाण केली. या मारहाणीत शिवाजी देशमुख हे जखमी झाले आहेत.
तसेच त्यांच्या छातीच्या बरगडीचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. जखमी शिवाजी देशमुख यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे प्रथमोपचार करून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्या नंतर शिवाजी देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार सुनील भालेराव याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. २८५/२०२५ भा. न्या. सं. ११७(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय बिक्कड हे तपास करीत आहेत.