

केज : अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने एकाला २० वर्षाचा कारावास आणि ६५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सतीश दिलीप खंडागळे (रा. लाखा ता. केज जि. बीड) असे या आरोपीचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, १४ डिसेंबर २०१८ रोजी केज तालुक्यातील लाखा येथील एक अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी त्या गावातील सतीश खंडागळे याने तिला जबरदस्तीने पळून नेले. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारी करून केज पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनंतर पोलिसांनी त्या मुलीचा शोध घेतला असता आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर केज पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अंकुश नागटीळक यांनी त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे या प्रकरणात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. राम बिरंगळ यांनी एकुण ७ साक्षीदार तपासले. त्यात फिर्यादी, पिडीत, वैद्यकीय अधिकारी व इतर साक्षीदार तसेच तपासी अधिकारी तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक नागटीळक यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
तसेच केज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी वेळोवेळी सरकार पक्षाला मदत केली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ लांडगे यांनी कामकाज पाहिले. दरम्यान सरकार पक्षातर्फे साक्ष पुरावा व दोन्ही बाजुचा युक्तीवाद लक्षात घेऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश कुणाल जाधव यांनी आरोपी सतीश दिलीप खंडागळे याला अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार केल्याप्रकरणी २० वर्षाचा कारावास ६५ हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावली.