

सिडको : विवाहाचे आमिष दाखवून हॉटेल मॅनेजरने तरुणीला लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑगस्ट २०२४ मध्ये पीडिता अंबड गावातील एका हॉटेलमध्ये हाऊसकिपिंगचे काम करत होती. त्याच हॉटेलमध्ये आरोपी भागीनाथ भास्कर लोखंडे हा मॅनेजर म्हणून काम करत होता. कामाच्या निमित्ताने पीडिता आणि लोखंडे यांची ओळख झाली. लोखंडेने पीडितेला लग्नाचे वचन देत २० सप्टेंबरला लेखानगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नेत अत्याचार केले. पुन्हा सात-आठ दिवसांनंतर सिडकोतील एका हॉटेलमध्ये अत्याचार केले. त्यानंतर २० ऑक्टोबरला रात्री आरोपीने पीडितेला पाथर्डी फाटा येथे एका हॉटेलमध्ये बोलावत अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी भागीनाथ व पीडिता मोटारसायकलीने पुणे येथे गेले. तेथे त्याचा मित्र राहत असलेल्या दिवेगाव - पुणे येथील हॉटेल अगत्य लॉजवर पुन्हा अत्याचार केले. आरोपी भागीनाथ याचे पहिले लग्न झाले असून त्याला तीन मुले आहेत, असे समजल्यानंतर पीडितेने तिच्या आईला व मामांना फोन करून पुण्यात बोलावून घेतले व झालेल्या प्रकाराची माहिती दिली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भागीनाथ लोखंडेविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.