नाशिक : म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत नराधम पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करीत धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी म्हसरूळ ठाण्यात पित्याविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरात राहणाऱ्या व आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित पित्याने एप्रिल महिन्यात मुलीवर धमकावत अत्याचार केला. तब्येत बरी नसल्याने मुलगी शाळेत गेली नव्हती. तसेच कामानिमित्त मुलीची आई व आजी घराबाहेर गेले होते. त्यावेळी पित्याने मुलीवर अत्याचार केला. तसेच अत्याचाराचे त्याच्या मोबाइलमध्ये चित्रीकरण करून कोणाला अत्याचाराची माहिती सांगितल्यास जिवे मारेल अशी धमकी पित्याने मुलीला दिली. त्यामुळे पीडिता घाबरली होती. त्यानंतर पित्याने धमकावत मुलीवर अत्याचार केले. याप्रकरणी पीडितेच्या आईने म्हसरूळ पोलिस ठाणे गाठून पतीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पीडितेच्या आईने संशयिताचा मोबाइल तपासला. त्यात फोल्डरमध्ये मुलीवरील अत्याचाराचा व्हिडिओ दिसल्याने आईच्या पायाखालील वाळू सरकली. तिने मुलीला विश्वासात घेत चौकशी केली असता, अत्याचाराची घटना समोर आली.