

A game of 'Teen Patti' was underway at the lodge
परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : शहरातील लॉजमध्ये सुरू असलेल्या तीन पत्ती जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून पर्दाफाश केला. उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्या पथकाने संभाजीनगर पोलिसांच्या सहकार्याने केलेल्या या कारवाईत 11 जणांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून 2 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम, दहा मोबाईल, दोन दुचाकी, एक बुलेट आणि स्कॉर्पिओ कार असा एकूण 29 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध जुगार अड्ड्यांचे धाबे दणाणले आहेत.
शनिवारी (दि. 31) रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास पंचशीलनगर बसस्थानक परिसरातील साई पॅलेस लॉजमध्ये ही कारवाई करण्यात आली. लॉजमधील खोली क्रमांक 401 मध्ये काही जण तीन पत्तीचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्या पथकाने संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह लॉजवर धाड टाकली. रविवारी पहाटे 3.28 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. पोलिसांनी खोलीत छापा टाकला असता तेथे जुगाराचा डाव सुरू असल्याचे आढळून आले. या कारवाईत 11 जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 2 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम आणि विविध कंपन्यांचे दहा मोबाईल जप्त करण्यात आले.
याशिवाय पांढऱ्या रंगाची जिजा स्कूटी, लाल रंगाची मेस्ट्रो स्कूटी, काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड बुलेट आणि काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कारही पोलिसांनी ताब्यात घेतली. जप्त वाहनांची किंमत 26 लाख 90 हजार रुपये असून, रोख रकमेसह एकूण मुद्देमाल 29 लाख 60 हजार रुपयांचा आहे. या प्रकरणात लॉज व्यवस्थापक चंद्रकांत रामराजा राऊत याच्यासह अन्य दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फायद्यासाठी कमिशन घेऊन जुगार खेळण्यासाठी खोली उपलब्ध करून दिल्याचा आरोप लॉज व्यवस्थापकावर करण्यात आला आहे.
याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुजरवाड पुढील तपास करीत आहेत. लॉजसारख्या ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे शहरातील अवैध धंद्यांविरोधातील पोलिसांच्या मोहिमेकडे लक्ष लागले आहे.