बीड : हिंगणीत घरफोडी; आठ लाखाचा मुद्देमाल पळविला | पुढारी

बीड : हिंगणीत घरफोडी; आठ लाखाचा मुद्देमाल पळविला

दिंद्रुड; पुढारी वृत्तसेवा : धारूर तालुक्यातील हिंगणी बु. येथे मध्यरात्री घरफोडी करून चोरट्यांनी आठ लाख सोळा हजार एकशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल पळविला. ही घटना मंगळवारी (दि.०३) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. घरातील जवळपास अकरा तोळे सोने, दोनशे पन्नास ग्रॅम चांदी व नव्वद हजार रुपये रोख चोरट्यांनी चोरून नेली. सोमवारी दिंद्रुड पोलिस, बीड स्थानिक गुन्हे शाखा, ठसे तज्ञ, श्वानपथकाने घटनास्थळी भेट दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, हिंगणी बु. येथील भाऊसाहेब सोळंके हे रविवारी (दि.०२) रात्री जेवण करून सोळंके कुटुंबीय झोपले असताना सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चार चोरट्यांनी सोळंके यांच्या घराच्या चॅनल गेट चे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर सोळंके यांना मारहाण करून चाकूचा धाक दाखवत दाखवत सोने चांदी, पैसे कुठे ठेवल्याचे विचारले. त्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने, चांदीचे जुने भांडे व बी-बियाणे भरण्यासाठी मित्राकडून हातउसने आणलेले नव्वद हजार रुपये नगदी असा एकूण ०८ लाख १६ हजार एकशे पस्तीस रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला. यामध्ये सोन्याचा मोहन हार, मिनी गंठण, नट अंगठी, गोठ अंगठी, बिंदल्या, चांदीचे छोटे-मोठे जुने भांडे या दागिन्यांसह रोख नव्वद हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. चोरट्यांच्या मारहाणीत सोळंके यांच्या गुडघ्याला दुखापत झाली असून, हाताला जखम असताना चोरट्यांनी हातातील दहा ग्रॅमची अंगठी ओरबाडून घेतली. सर्व मुद्देमाल गुंडाळून चोरांनी तिथून पोबारा केला.

दरम्यान दिंद्रुड पोलीसांनी सोमवारी घटनास्थळी श्वान पथकासह, स्थानिक गुन्हे शाखा, ठसे तज्ञांनी भेट देत पंचनामा केला असून सोळंके यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास सपोनि अण्णाराव खोडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खरात करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button