बीड: धारूरमध्ये रास्ता रोको आंदोलन केल्यास गुन्हे नोंद होणार | पुढारी

बीड: धारूरमध्ये रास्ता रोको आंदोलन केल्यास गुन्हे नोंद होणार

अतुल शिनगारे

धारूर : सगेसोयरे अध्यादेश मंजूर करण्यासाठी शनिवारी (दि.२४) रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, याबाबत धारूर तहसील प्रशासन, पोलीस यांना मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावर पोलिसांनी रास्ता रोको आंदोलन केल्यास आपल्यावर गुन्हा नोंद करण्याची नोटीस दिली जाईल, असे म्हटले आहे. पोलीस प्रशासन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न का करत आहे?, असा प्रश्न सकल मराठा समाजाने केला आहे.

मराठा आरक्षणाच्या समर्थनासाठी तालुक्यातील धारूर, अंजनडोह, चोरंबा, तांदळवाडीसह पंचक्रोशीतील मराठा समाजाने शनिवारी (दि.२४) सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक, तसेच ग्रामीण भागातील रस्त्यावर ठीक-ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिलेले आहे.

पोलीस प्रशासनाने कलम १४९ सीआरपीसी प्रमाणे निवेदन धारकांना नोटीस दिली आहे. बीड जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेला आहे. आपली मागणी ही मराठा समाजाच्या जनहिताची असल्याने आपण त्यासाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा न करता तालुका प्रशासनास बेकायदेशीर आंदोलनाचा इशारा देऊन वेठीस धरत आहात, हे नियमबाह्य व खेदजनक आहे. आपण रास्ता रोको आंदोलन केल्यास सर्वसामान्य माणसांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होईल. राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होणार असल्याने आंदोलनास परवानगी नाकारली आहे. तसेच आंदोलन केल्यास आंदोलन कर्त्यांवर गुन्हा नोंद करणार असल्याच्या नोटीसी काढल्या आहेत. त्यामुळे आंदोलन दडपण्याचा अट्टाहास पोलीस का करत आहेत, असा सवाल सकल मराठा समाजाने केला आहे.

हेही वाचा 

Back to top button