Rambai Ranveer inspirational story : लेकीच्या शिक्षणासाठी आईची मॅरेथॉन दौड!

४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी पटकावले प्रथम पारितोषिक
Rambai Ranveer inspirational story
लेकीसाठी अनवानी धावणाऱ्या रमाबाई.pudhari photo
Published on
Updated on

अंबाजोगाई : ना महागडे स्पोर्ट्स शूज, ना ट्रॅकसूट, ना प्रशिक्षक... हातात होती ती केवळ रोजच्या कष्टांची ताकद आणि मनात दोन मुलींच्या भविष्याची चिंता! याच जिद्दीच्या जोरावर स्वयंपाकाचे काम करणार्‍या ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी अंबाजोगाईत आयोजित ‘अमृत दौड’मध्ये साडी नेसून आणि स्लीपर हातात धरून अनवाणी धावत प्रथम क्रमांक पटकावला.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवानबाबा चौक या मार्गावर नुकतीच ‘अमृत दौड’ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. खुल्या गटातील या स्पर्धेत शेकडो धावपटूंनी सहभाग घेतला होता.

Rambai Ranveer inspirational story
Nanded illegal sand mining : अवैध वाळू उपशावर डीआयजींच्या पथकाचा सर्जिकल स्ट्राईक

या गर्दीत रोजच्या साध्या साडीत रमाबाई रणवीर उभ्या होत्या. स्पर्धेला सुरुवात होताच तरुण-तरुणी वेगाने पुढे निघून गेले. मात्र, काही अंतर पार केल्यानंतर पायातील स्लीपर निसटू लागल्याने रमाबाईंनी दोन्ही स्लीपर हातात घेतले आणि अनवाणी पायाने धावण्यास सुरुवात केली.

पावसामुळे गार झालेला रस्ता, पायाला टोचणारे खडे आणि अंगावरची साडी... अशा प्रतिकूल परिस्थितीतही रमाबाईंची धाव थांबली नाही. एका हाताने साडीचा पदर सांभाळत आणि दुसर्‍या हातात स्लीपर घेऊन त्या धावत राहिल्या. पाहता पाहता त्यांनी ट्रॅकसूट आणि स्पोर्ट्स शूज घालून धावणार्‍या अनेक स्पर्धकांना मागे टाकले आणि अखेर फिनिशिंग लाईनवर सर्वप्रथम धडक मारली. रमाबाईंनी प्रथम क्रमांकाचे 3 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.

Rambai Ranveer inspirational story
Nanded Crime : नंदगावच्या सरपंचाचा पंचायत समिती आवारात जीवन संपवण्याचा प्रयत्न

पारितोषिक स्वीकारल्यानंतर रमाबाई म्हणाल्या, पोरांच्या संसारासाठी रोज धावपळ करते, आज स्वतःसाठी धावले. त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांच्या मनाला चटका लावला.

मुलींच्या शिक्षणासाठी हिंगोली सोडून अंबाजोगाईत मुक्काम

पतीच्या निधनानंतर दोन मुलींच्या पालनपोषणासह त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी रमाबाईंच्या खांद्यावर आली. मुलींना शिकवून मोठे करण्यासाठी त्यांनी मूळ गाव हिंगोली सोडून अंबाजोगाईत वास्तव्यास येण्याचा निर्णय घेतला. येथे त्या विविध कुटुंबांकडे स्वयंपाकाचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.

मुलीच्या ‘फी’ साठी अकॅडमीतच करतात स्वयंपाक

रमाबाईंची एक मुलगी बीएससीचे शिक्षण घेत आहे, तर दुसरी मुलगी पोलिस भरतीची तयारी करत आहे. पोलिस भरती अकॅडमीची फी भरण्यासाठी आर्थिक अडचण असतानाही रमाबाईंनी हार मानलेली नाही. मुलीची फी भरता यावी म्हणून त्या चक्क त्याच अकॅडमीत स्वयंपाकाचे काम करतात. स्वतःच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी मुलींच्या स्वप्नांना पंख देण्याची त्यांची धडपड सुरूच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news