

किनवट : नंदगाव येथील नाली बांधकामाच्या मूल्यांकनासह ‘मेजरमेंट बुक’ (एमबी) नोंदविण्याची प्रक्रिया रखडल्याच्या पार्श्वभूमीवर सरपंच युवराज भडांगे यांनी सोमवारी किनवट पंचायत समितीच्या आवारात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना रोखल्याने अनर्थ टळला. या बांधकामाबाबत तक्रार प्राप्त झाल्याने संबंधित कामाची प्रक्रिया प्रलंबित असल्याची माहिती पुढे आली आहे.
नंदगाव येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नालीचे बांधकाम करण्यात आले होते. या कामाबाबत नंदगाव येथील बालाजी जनार्धन जाधव यांनी बांधकामाच्या गुणवत्तेसंदर्भात पंचायत समितीकडे तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पंचायत समितीच्या संबंधित विस्तार अधिकाऱ्यांसह बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी नाली बांधकामाची पाहणी केल्याची माहिती आहे.
तक्रार प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित कामाची ‘एमबी’ नोंद करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, कामाचे मूल्यांकन करून ‘एमबी’ नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी सरपंच भडांगे यांनी केली होती. तसेच ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास ३१ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिल्याचे समजते.
सोमवारी सरपंच भडांगे पंचायत समितीच्या आवारात डिझेल घेऊन आले. त्यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना रोखले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
घटनेनंतर गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांनी सरपंच भडांगे यांना आपल्या कक्षात बोलावून चर्चा केली. यावेळी संबंधित नाली बांधकामाचे नियमांनुसार मूल्यांकन करून ‘एमबी’ नोंदविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित उपअभियंत्यांना दूरध्वनीद्वारे देण्यात आल्याची माहिती आहे. एका दिवसात कामाचे मूल्यांकन करून नियमानुसार पुढील प्रक्रिया करण्यास सांगण्यात आले.
यानंतर सरपंच भडांगे यांचे समाधान झाल्याचे सांगण्यात आले असून, आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे निर्माण झालेला तणाव निवळला. मात्र, नाली बांधकामाबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची तसेच संबंधित कामाच्या मूल्यांकन व देयक प्रक्रियेची नियमानुसार कार्यवाही झाल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.