

माजलगाव : गेल्या अनेक वर्षांपासून अपघातांचे केंद्र ठरलेल्या तेलगाव-माजलगाव महामार्गाच्या दुरुस्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामासाठी तब्बल 33 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. रस्त्यावरील मोठमोठ्या भेगा, खड्डे आणि निकृष्ट अवस्थेमुळे मृत्यूचा सापळा बनलेल्या या मार्गाची दुरुस्ती आता लवकरच सुरू होणार असल्याने वाहनधारकांसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सुमारे 33.81 कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कंत्राटदार निश्चितीची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात असल्याची माहिती शासनस्तरावरून देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेला दिंडी मार्ग हस्तांतरणाचा प्रश्नही आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
खामगाव-पंढरपूर पालखी मार्गाचा भाग असलेल्या या महामार्गावर गेल्या काही वर्षांत भीषण अपघातांची मालिका सुरू होती. रस्त्याला पडलेल्या खोल भेगा आणि धोकादायक स्थितीमुळे दुचाकीस्वार यांसह अनेक वाहनधारकांना जीव गमवावा लागला. गेल्या चार वर्षांत तब्बल 30 ते 35 जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची नोंद असून शेकडो जण गंभीर जखमी झाले आहेत.
अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यातील तांत्रिक हस्तांतरणाच्या प्रक्रियेमुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दीर्घकाळ रखडले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. विविध सामाजिक संघटना, ग्रामस्थ आणि वाहनधारकांनी वारंवार आंदोलने करून हा प्रश्न ऐरणीवर आणला होता.
आता अखेर शासनाने या प्रश्नाची गंभीर दखल घेत निधी उपलब्ध करून दिल्याने दुरुस्तीच्या कामाला वेग येणार आहे. रस्ता दुरुस्त झाल्यानंतर वाहनधारकांची होणारी गैरसोय कमी होणार असून प्रवास अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. आता तरी अपघातांची मालिका थांबेल आणि निष्पापांचे जीव वाचतील, अशी भावना परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. महामार्गाची दुरुस्ती वेळेत आणि दर्जेदार व्हावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.