

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. कोणतीही निवडणूक असो धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यातील लढतीची नेहमीच चर्चा होते. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर ताबा हा राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे ही निवडणूक संपुर्ण प्रतिष्ठा पणाला लावून लढली जाईल, असे वाटत असतानाच संघर्ष टाळून मुंडे बहीण-भाऊ एकत्र येणार? अशा हालचाली दिसून येत आहेत. त्यामुळे वैद्यनाथ कारखाना निवडणूक बिनविरोध होण्याच्या शक्यतेची चर्चा होत आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे व माजी मंत्री धनंजय मुंडे हे बहीण-भाऊ या निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता आहे. माजी चेअरमन पंकजा मुंडे यांना पुन्हा चेअरमनपदाची संधी मिळणार आहे. त्यांची व अन्य संचालक पदाच्या दहा जागा बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संचालक पदाच्या एकूण 21 जागांपैकी अकरा जागा पंकजा मुंडे यांच्या गटाला तर धनंजय मुंडे यांच्या गटाला दहा जागा दिल्या जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. जागा वाटपाचा 10 -11 चा फॉर्मुला या निवडणुकीत राहील, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, २१ जागांच्या निवडणुकीसाठी एकूण ५० अर्ज दाखल झाले आहेत. यावेळी वैद्यनाथसाठी प्रज्ञाताई गोपीनाथराव मुंडे, पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे यांनी अर्ज भरले आहेत. धनंजय मुंडे यांनी मात्र अर्ज दाखल केलेला नाही. धनंजय मुंडे यांच्या गटातील त्यांचे बंधु अजय मुंडे तसेच वाल्मिक कराड यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचे अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. ही निवडणूक संघर्ष टाळून बिनविरोध करण्याच्या दृष्टिने गतिमान हालचाली सुरु असुन वैद्यनाथ कारखाना निवडणूक बिनविरोध होण्याच्या शक्यतेची चर्चा होत आहे.
हेही वाचा :