बीड : बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी द्या; अंबाजोगाईत निषेध मोर्चा

मोर्चा,www.pudhari.news
मोर्चा,www.pudhari.news

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा : अंबाजोगाई तालुक्यात सहा वर्षीय बालिकेवर साठ वर्षांच्या नराधमाने केलेल्या अत्याचाराच्या घटनेचे अंबाजोगाई शहरात आज (दि.८) तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी विविध महिला संघटना, रोटरी क्लब, सामाजिक कार्यकर्त्यांनी आज निषेध मोर्चा काढला. या मोर्चात शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षिक यांच्यासह राजकीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अंबाजोगाई तालुक्यात एका सहा वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून एका वृद्धाने अत्याचार केल्याची निंदनीय घटना गेल्या आठवड्यात घडली. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयीत आरोपी विष्णू बाबुराव सादुळे (वय ६०) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पिडीत बालिका अंबाजोगाई येथील एका शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेते. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.०२) शाळेतून घरी आल्यानंतर ती खेळण्यासाठी गेली होती. रात्री ती कोणासोबत काहीही न बोलता एकटीच शांत बसली होती. आई-वडिलांनी तिला विचारले असता पोट दुखत असल्याचे तिने सांगितले. दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यानंतरही तिचे पोट दुखत होते. त्यामुळे वडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने आपबीती सांगितली. गुरुवारी दुपारी ती मैत्रिणीसोबत खेळत असताना संशयित आरोपी विष्णू सादुळे तिथे आला. त्याने चॉकलेट देतो असे आमिष दाखवून तिला जुन्या घरात घेऊन गेला. तिथे तिच्यावर अत्याचार केला आणि कोणाला काही सांगितल्यास मारून टाकीन, अशी धमकी दिली. सुरुवातीस इभ्रतीच्या भीतीने चिमुकलीच्या मातापित्यांनी कोणालाच काही सांगितले नाही. मात्र, ग्रामस्थांनी धीर दिल्यानंतर त्यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सदर तक्रारीवरून विष्णू सादुळे याच्यावर पोक्सोसह कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवून त्याला अटक करण्यात आली. सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी पुढील तपास पिंक पथक प्रमुख पोलीस उपनिरिक्षक सुचिता शिंगाडे करत आहेत.

या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील सर्व महिला संघटनांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news