खेड कृषी उत्पन्न बाजार समिती : अंतिम मतदारयादी 20 रोजी जाहीर | पुढारी

खेड कृषी उत्पन्न बाजार समिती : अंतिम मतदारयादी 20 रोजी जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारयादीचा कार्यक्रम दोन वेळा जाहीर होऊन मतदारयाद्या देखील अंतिम करण्यात आल्या. परंतु, नव्याने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमधील सरपंच व अन्य सदस्यांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून तिस-यांदा मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 8 मार्चपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. यावर 17 मार्चपर्यंत सुनावणी घेऊन 20 मार्च रोजी अंतिम मतदारयादी जाहीर होणार आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दोन वेळा मतदार यादी अंतिम करण्यात आली.
या दरम्यान खेड तालुक्यातदेखील मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. नव्याने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेण्यात आली, यामुळे आता तिस-यांदा मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

20 मार्चला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. दुस-या मतदारयादीत 3873 अंतिम मतदार होते. यामध्ये वाढ होऊन ही संख्या 3923 पर्यंत वाढली आहे, यामुळे आता तरी 20 मार्चनंतर त्वरित निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल , अशी अपेक्षा आहे.
कोरोना आणि अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत; परंतु गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने सध्या बाजार समितीवर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.

संस्थानिहाय बाजार समिती मतदारयादी
कृषी पतपुरवठा संस्था मतदार संस्था : 1274, ग्रामपंचायत मतदार सभासद : 1433, व्यापारी व अडते मतदार सभासद : 967, हमाल व तोलारी मतदार सभासद : 249, एकूण मतदार सभासद : 3923

मतदानाच्या हक्कापासून कोणी वंचित राहू नये यासाठी आता तिस-यांदा मतदारयादी अंतिम करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारांमध्ये वाढ होऊन ही संख्या 3923 वर जाऊन पोहचली आहे. हरकती व सुनावणी घेऊन 20 मार्च रोजी यादी अंतिम करण्यात येईल.

                          हरिश्चंद्र कांबळे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, खेड

Back to top button