केज; पुढारी वृत्तसेवा : एका ऊसतोड करणाऱ्या महिलेस तू आमच्या सोबत ऊस तोडणीच्या कामाला का येत नाहीस ? अशी विचारणा करत बळजबरीने विषारी द्रव्य पाजून तिचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील जोला येथे २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७: ३० वाजता राहीबाई अशोक ढाकणे (वय ३६) घरात एकटी होती. त्यावेळी अशोक ढाकणे व दैवशाला ढाकणे तिच्या घरी गेले. आमच्यासोबत ऊस तोडणीसाठी चल, असे तिला म्हणाले. तेव्हा राहीबाई त्यांना म्हणाली की, मागील वर्षीचे तुमच्याकडे असलेले ४४ हजार रुपये द्या. असे म्हणताच अशोक ढाकणे व दैवशाला ढाकणे यांनी राहीबाईच्या केसांना पकडून तिला खाली पाडले. तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने अच्युत ढाकणे याने तिला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या महिलेवर अंबाजोगाई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून केज पोलीस ठाण्यात अशोक ढाकणे, दैवशाला ढाकणे, अच्युत अण्णासाहेब ढाकणे या तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील करीत आहेत.
हेही वाचा :