जळगाव : शासकीय पोर्टल हॅक केले अन् ४५ जणांना टोचली कोरोनाची बनावट लस | पुढारी

जळगाव : शासकीय पोर्टल हॅक केले अन् ४५ जणांना टोचली कोरोनाची बनावट लस

जळगाव, पुढारी ऑनलाईन : शुक्रवारी (दि. ३१) एनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी कपील पवार यांनी आरोग्य पथकासह बोदवड शहरातील दत्त कॉलनी आणि उर्दू शाळा परिसरात दुपारी २ वाजता लसीकरण मोहीम राबवली होती. त्यामध्ये त्यांनी दीड तासात ९८ नागरिकांचे लसीकरण केले होते.

त्यांची नोंद ही रीतसर शासकीय पोर्टलवर केली होती. परंतु सदर पोर्टलवर त्यांनी नोंदणीची आकडेवारी पाहिली असता त्यावर लसीकरण मात्र १४४ नागरिक झालेले दिसून आले. यावरून त्यांनी रजिस्टर नोंदी पहिल्या असता फक्त ९८ नागरिक लस घेतलेले दिसून आले.

तर पोर्टलवर मात्र तब्बल ४५ नावे लसीकरण न करताच वाढलेली दिसून आली आणि त्यांच्या नावे लसीकरणाची नोंद झाल्याचे दिसून आले. त्या लस न घेतलेल्या नावाची नोंद त्यांनी घेतली. याबाबत त्यांनी डेटा ऑपरेटरशी चर्चा ही केली  परंतु, सदर लसीकरणाची नोंद करणारे पोर्टल अज्ञात व्यक्तीने हॅक करत या नोंदी केल्याचे सांगण्यात आले.

याबाबत फिर्यादी एनगाव येथील प्राथमिक आरोग्य अधिकारी कपिल पवार यांनी बोदवड पोलिसांत त्या ४५ नागरिकांविरुद्ध तक्रार दिली असून बोदवड पोलिसांत कलम १७०, १८८, २६९, २७०, ४६५, ४६६, ४६८, ४७१, प्रमाणे नोंद केली आहे.

Back to top button