Corona 2022 : आठ दिवसांत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ६.३ टक्क्यांची वाढ - पुढारी

Corona 2022 : आठ दिवसांत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ६.३ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जगभरात कोरोना महारोगराईचा प्रकोप सुरू झाल्यापासून ४ जानेवारी २०२२ रोजी कोरोनारूग्णसंख्येने उच्चांक गाठला. या दिवशी जगात २५.२ लाख कोरोनाबाधित आढळले. मंगळवारी समाप्त झालेल्या आठवड्यात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी ६५% रूग्ण अमेरिका, यूके, फ्रान्स, इटली तसेच स्पेनमध्ये आढळले, अशी माहिती बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. देशात गेल्या आठ दिवसात कोरोनारूग्ण संख्येत ६.३ टक्क्यांहून अधिकची वाढ नोंदवण्यात आली आहे. (Corona 2022)

२९ डिसेंबरला कोरोना संसर्गदर ०.७९ टक्के होता. ५ जानेवारीला हा दर ५.०३ टक्क्यांवर पोहचला. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ, तामिनाडू, कर्नाटक, झारखंड तसेच गुजरात मधील स्थिती चिंताजनक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेतून दिली. देशातील २८ जिल्ह्यांमध्ये आठवड्याचा कोरोना संसर्गदर १० टक्क्यांहून अधिक आहे. जगभरात ओमायक्रॉनमुळे १०८ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे देखील अग्रवाल म्हणाले. १५ ते १८ वयोगटातील लसीकरणासाठी देशातील ७.४० कोटी मुले पात्र असल्याचे देखील मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

देशात पसरणाऱ्या कोराना संसर्गाचा ओमायक्रॉन हा मुख्य व्हेरियंट आहे. संसर्ग फैलावाचा वेग कमी करण्यासाठी गर्दी टाळावी, असे आवाहन आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी केले. टाटा एमडी तसेच आयसीएमआरने मिळून ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी आरटी-पीसीआर किट विकसित केली आहे. या किटला डीसीजीआय ने परवानगी दिली आहे. या किटमुळे चार तासांमध्ये निदान होईल, असेही भार्गव म्हणाले. खबरदारी म्हणून येत्या काळात बूस्टर डोस लावण्यात येतील, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली. कोव्हॅक्सिन, कोव्हीशिल्ड लस लावण्यात आलेल्यांना तीच लस बूस्टर डोस म्हणून लावण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (Corona 2022)

कोरोना संसर्गाची अँटी व्हायरल औषध ‘मोल्नुपिरावीर’ संबंधी आरोग्याशी निगडीत समस्या आहेत. हाडे तसेच स्नायूंमध्ये या औषधांचा दुष्परिणाम होऊ शकतो. ही औषध घेतल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत गर्भधारणा करू नये, याचा मुलाच्या विकासावर प्रभाव पडू शकतो. यामुळे कोरोनाच्या राष्ट्रीय उपचार कार्यक्रमात या औषधाचा समावेश करण्यात आला नसल्याचे भार्गव म्हणाले.

Back to top button