

पुढारी ऑनलाईन: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची मंगळवारी उत्तर प्रदेशातील हापुड़, गढ़मुक्तेश्वर येथे जाहीर सभा झाली. सभेसाठी कार्यकर्त्यांनी मोठमोठ्या होर्डिंग्जवर लाखोंचा खर्च केला होता, मात्र सभेला पोहोचलेल्या काही लोकांनी हे होर्डिंग्स उखडून टाकले आणि सिलेंडरच्या किमती जास्त वाढल्या असल्याने चुलीत जाळण्यासाठी या लाकडांचा उपयोग होईल, असे सांगून घरी नेले. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हापुड़, गढ़मुक्तेश्वर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यामध्ये भाजपच्या नेत्यांनी मोठमोठे होर्डिंग्ज-बॅनर लावले असून त्यावर मोठा खर्च करण्यात आला होता.
जाहीर सभा आटोपल्यानंतर काही लोक हे होर्डिंग्स उखडून टाकताना दिसले. तिथे उपस्थित महिला म्हणाली, 'आम्ही मजूर लोक आहोत. भाड्याच्या घरात राहतो. सिलेंडर 1000 हजार रुपयांना असून खूप महाग आहे, त्यामुळे तो भरता येत नाही. इतर काही महिलाही होर्डिंगमधील लाकडे काढताना दिसल्या. लाकडे का घेऊन जात आहात, असे विचारले असता त्यांनी सिलेंडर खूप महाग असल्याचे सांगितले. आम्ही ते पुन्हा भरून घेऊ शकत नाही. ही लाकडं घरातील अन्न शिजवण्यासाठी वापरले जाईल. यामुळे आमची चूल पेटण्यास मदत होईल असं देखील या महिला म्हणाल्या.
भाजप मुख्यालयातून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीनुसार, नड्डा यांनी आपल्या भाषणात असा दावाही केला की, 2022 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित होईल. कानपूरमधील एका परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरावर छापे मारल्याचा संदर्भ देत भाजप अध्यक्ष म्हणाले की, 250 कोटींहून अधिक रोकड इतरत्र सापडली आहे, पण त्यामुळे अनेकांची प्रकृती बिघडली आहे. सपाच्या अखिलेश सरकारच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि त्यानंतर एक मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असल्याचा आरोप नड्डा यांनी केला.