धुळे, पुढारी वृत्तसेवा
धुळे तालुका पोलीस ठाण्यात नेमणुकीस असणारे सहाय्यक उप निरीक्षक रमेश गंगाराम साळवे यांच्याकडे 2015 पासून वेगवेगळे गुन्हे व अर्ज तपासासाठी देण्यात आले होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये साळवे हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांना पोलीस निरीक्षक यांनी वेगवेगळ्या प्रकरणातील 49 गुन्हे व अर्ज यांच्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र २०१५ ते आजपर्यंतच्या कालावधीतील सदर गुन्ह्यांचा तपास व चौकशी साळवे यांनी पूर्ण केली नसल्याची बाब निदर्शनास आली.
त्याचबरोबर तपास यादीतून हे गुन्हे कमी करून दोषारोपपत्र स्थळ पत्र लावून न्यायालयात दोषारोपपत्र लावली गेली नाही. तसेच शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही साळवे यांनी त्यांच्याकडील गुन्ह्याची तसेच चौकशीची कागदपत्रे, लेखी आदेश मिळूनही तालुका पोलिस ठाण्यात जमा केली नाही. या गुन्ह्यातील मूळ कागदपत्र विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कागदपत्रे नष्ट करून संबंधित आरोपींना वाचवण्यासाठी मदत केल्याचा ठपका तक्रारीत ठेवण्यात आला. ही बाब निदर्शनास आल्याने पोलीस नाईक राकेश आत्माराम ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रमेश साळवे यांच्या विरोधात भादवि कलम 166 (अ ) ( ब ), 201 217 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा