उमरगा: पुढारी वृत्तसेवा : उमरगा शहरात महिनाभरापूर्वी उद्घाटन करण्यात आलेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नुतन इमारतीचा काच तावदान सांगाडा बुधवारी (दि. ५) सायंकाळी सहाच्या सुमारास कोसळला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काचेचे मोठे नुकसान झाले. तर परिसरात काचेच्या तुकड्यांचा मोठा खच पडला आहे. त्यामुळे संपूर्ण इमारत बांधकाम दर्जा बाबतीत वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत.
उमरगा येथील न्यायालय कामकाज करण्यासाठी जुनी इमारत अपुरी पडत होती. पुढील पन्नास वर्षाच्या नियोजनाप्रमाणे १८ कोटी रुपये खर्च करून तब्बल पाच वर्षांनी स्वतंत्र नवीन इमारत बांधकाम करण्यात आले. इमारतीची रचना वन प्लस थ्री असून वरच्या इमारतीत सहा न्यायालय कक्ष, विधीज्ञ कक्ष, बैठक कक्ष, पक्षकारांसाठी बसण्यासाठी विभाग, अभ्यासिका कक्ष, अपंग व्यक्तीसाठी लिफ्टची सोय यासह विविध सोयी सुविधा इमारतीत उभारण्यात आलेल्या आहेत. इमारतीचे अजून बरेच कामे शिल्लक असताना घाईगडबडीत न्यायालयाच्या नूतन इमारतीचे सर्वोच न्यायालयाचे न्यायमूर्तीं यांच्या हस्ते एप्रिल महिन्यात (दि २७) मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले होते.
त्यानंतर लगेचच नवीन इमारतीमध्ये न्यायालयीन कामकाज सुरू करण्यात आले. इमारतीच्या पश्चिम बाजुस न्यायाधीशांना ये जा करण्यासाठी स्वतंत्र जिना व वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्याने जिन्याला उभारण्यात आलेल्या तीन मजली काच तावदान सांगाडा कोसळला. न्यायालयीन कामकाज संपल्यामुळे परिसरात कोणीही नव्हते. त्यामुळे यात सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, तावदानाचे मोठे नुकसान झाले आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वी बसविण्यात आलेले काचेचे तावदान कोसळल्याने बांधकाम दर्जा, कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचा ४ ऑगस्ट २०१९ रोजी कोनशिला शुभारंभ करण्यात आला होता. संबंधित कंत्राटदाराने मुदतीत बांधकाम पूर्ण केले नाही. बांधकामाला पाच वर्ष लागली आहेत. अजूनही बरेच काम शिल्लक असताना २७ एप्रिल २०२४ रोजी घाईघाईत उद्घाटन करण्यात आले. काम पूर्ण होण्याआधीच तीन मजली जिन्याचे काच तावदान सांगाडा कोसळल्याने संपूर्ण इमारत बांधकाम दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा