धाराशीव: उमरगा येथे अवकाळीचे थैमान; वीज कोसळून जनावरे दगावली, मुरूम येथे दोघे जखमी

धाराशीव: उमरगा येथे अवकाळीचे थैमान; वीज कोसळून जनावरे दगावली, मुरूम येथे दोघे जखमी

उमरगा; पुढारी वृत्तसेवा : शहर व परिसरात अवकाळी पावसाने चांगलेच थैमान घातले असून शनिवारी (दि. २०) दुपारी दोन ते तीनच्या सुमारास तब्बल एक तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरू असतानाच वेगवेगळ्या चार ठिकाणी विजा पडून तीन गाई, एक म्हैस व सात शेळ्या दगावल्या. तर मुरूम येथे दोघे जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

शहर व तालुक्यात गेल्या आठवड्यापासून वातावरण बदलाचा मोठा परिणाम झाला आहे. दिवसभर कधी ढगाळ तर कडक उन्हाची तीव्रता जाणवत असताना शहर व तालुक्यातील मुळज, तलमोड तुरोरी, मुरूम येणेगुर तुगांवासह बहुतांश ठिकाणी शनिवारी दुपारी दोन च्या सुमारास वादळी वारे, कानठळ्या बसविणाऱ्या मेघगर्जेसह जवळपास एक तास जोरदार अवकळी पाऊस झाला. यामूळे अनेकाच्या घरावरिल पत्रे उडून गेली असून झाडे ही उन्मळून पडली आहेत. मागील आठवड्यात गारपीट व अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला असताना पुन्हा झालेल्या पावसामुळे भाजीपाला, आंबा, द्राक्ष, केळी, पपई, टरबूज आदी फळबागांची मोठी हानी झाली आहे.

शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या राशी केल्या असल्या तरी जनावरां साठी जमा करून ठेवलेला चारा व कडब्याच्या गंजी पावसात भिजल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहर व ग्रामीण भागात सकाळ पासूनच अधून मधून ढगाळ वातावरण व मोठ्या प्रमाणात उष्णता होती. त्यात पावसाची हजेरी लावल्याने उकाडया पासून काहीशी सुटका झाली. तर वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान सायंकाळी पुन्हा विजांचा गडगडाट व अधून मधून पावसाच्या सरी सुरूच होत्या.

वीज पडून चार जनावरांसह सात शेळ्या दगावल्या ; मुरूम येथे दोघे जखमी

तालुक्यातील तलमोड येथील चंद्रकात पंडीतराव मस्के, तुरोरी येथील शिवाजी व्यंकट जाधव तर धाकटीवाडी येथील मोहन देवराव चंडकापूरे या तीन शेतकऱ्याच्या वीज पडून अनुक्रमे प्रत्येकी एक गाय दगावली. तुगाव येथे वीज पडून व्यंकट करगले यांची म्हैस ठार झाली. मुरूम येथे ७ शेळ्या वीज पडून दगावल्या तर बिया शेख (वय ८०) हि वृद्ध महिला व अशोक तुकाराम देडे हे दोघे जखमी झाले असून यातील बिया शेख किरकोळ जखमी असल्याने घरीच आहेत. तर आशोक देडे यांच्यावर मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी उमरगा येथे पाठवल्याची प्राथामिक माहिती आहे.

तालुक्यातील तलमोड, धाकटीवाडी, तुरोरी, मुरूम व तुगाव येथे वीज पडल्यामुळे जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या मार्फत तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल पाठवण्यात येईल.

  • गोविंद येरमे, तहसीलदार उमरगा

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news