PM Modi : हा फक्त ट्रेलर, २५ वर्षांचा ‘विकासाचा रोडमॅप’ तयार : पंतप्रधान मोदी

PM Modi : हा फक्त ट्रेलर, २५ वर्षांचा ‘विकासाचा रोडमॅप’ तयार : पंतप्रधान मोदी
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : काँग्रेसला पाच ते सहा दशके काम करायला मिळाली. मला दहा वर्षेच मिळाली आहेत. दोघांना मिळालेला कालावधी आणि दोघांच्या कामगिरीची तुलना करून पाहावी. आम्ही कमी कालावधीत विकासाचा एक मोठा पल्ला गाठलेला आहे. कोरोनाशी आपण लढलो. बहुतांश देश कोरोनाने कोलमडलेले असताना आपण या संकटावर मात करून जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळविले. 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पुढील 25 वर्षांचा रोडमॅप आम्ही तयार केला आहे. 2047 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे झालेली असतील आणि देशाने विकसित भारत हे विकासाचे शिखर गाठलेले असेल, असा दुर्दम्य आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केला.

श्रीराम मंदिर, द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाकडून सनातन धर्मावरील टीका, युक्रेन-रशिया युद्ध, निवडणूक रोखे, देशाच्या विकासाचा रोडमॅप अशा अनेक विषयांना पंतप्रधान मोदींनी हात घातला. एएनआय वृत्तसंस्थेच्या संपादक स्मिता प्रकाश यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. माझे निर्णय कुणालाही घाबरवून सोडण्यासाठी नसतातच. राम मंदिराचेच बघा. विरोधी पक्षांसाठी हा मुद्दा म्हणजे भाजपविरोधातील एक शस्त्र होते आणि बघा काय झाले. मंदिर दिमाखात उभे राहिलेले आहे. विरोधकांच्या हातून हा मुद्दा निसटलेला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

यावेळी झालेली प्रश्नोत्तरे अशी ः

प्रश्न : तुम्ही अनेक भाषणांतून 2024 च्या निवडणुका माझे उद्दिष्ट नाही, माझे खरे उद्दिष्ट 2047 आहे, असे आपण सांगत आलात. 2047 पर्यंत काय असे होणार आहे? या निवडणुका काय केवळ औपचारिकता आहेत?
पंतप्रधान मोदी : मला वाटते, 2047 आणि 2024 या दोहोंची सरमिसळ करता कामा नये. दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत. जेव्हा आपण देश म्हणून स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत होते, तेव्हाच लोकांसमोर या विषयाची मांडणी करायला मी सुरुवात केली होती. 2047 मध्ये आपण स्वातंत्र्याची शतकपूर्ती साजरी करू. तो दिवस मैलाचा दगड असेल. अशा संधी व्यक्तीमध्ये नव्या संकल्पांची पेरणी करतात. मीही त्यातलाच एक आहे. मला वाटते, ही एक संधी आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 75 व्या वर्षापासून ते 100 व्या वर्षांपर्यंत आम्हाला प्रवास करायचा आहे. या 25 वर्षांचा पुरेपूर वापर आम्ही विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी सरकार म्हणून कसा करणार आहोत, त्याचा रोडमॅप आमच्या डोक्यात तयार आहे. प्रत्येक संस्थेने, प्रत्येक व्यक्तीनेही स्वत:साठी एक उद्दिष्ट ठरवून घ्यावे. व्यक्ती म्हणून मी हे एवढे करेन. संस्था म्हणून आम्ही हे एवढे करू.
आता यात 2024 चा जो काही विषय आहे, तो याच ओघात आलेला आहे. मला वाटते, लोकशाहीत निवडणुकांना गंभीरपणे घेतले पाहिजे. निवडणुका म्हणजे लोकशाहीचे महापर्वच. क्रीडा स्पर्धा समाजात एक खिलाडू वृत्ती निर्माण करतात, तसे निवडणुकांनी समाजात विकासाची वृत्ती निर्माण करायला हवी.
प्रश्न : तुम्ही नेहमी सांगता, हा तर केवळ ट्रेलर आहे. अजून तर खूप काही होणार आहे. तुमचे व्हिजन काय आहे नेमके आणि 2047 पर्यंत त्याला यश कसे मिळेल?
मोदी : माझ्या मनात खूप सारे मोठमोठाले आराखडे असतात. मी त्यासाठी अनेक धाडसी निर्णयही घेत आलो आहे. यात भिण्याचे काही कारणही नाही. माझे निर्णय मुळात कुणालाही घाबरविण्यासाठी, कुणाचे दमन करण्यासाठी नसतात. देशाचा सर्वांगीण विकास, जनकल्याण हाच हेतू त्यामागे असतो. देशात कलह व्हावा, वेळेचा अपव्यय व्हावा, असे मला अजिबात वाटत नाही.
मी सर्वच साध्य केलेले आहे, असे नाही. नेमक्या दिशेने वाटचाल मात्र केलेली आहे. पुढील कालखंडासाठी रोडमॅपचे काम सुरू आहे. मुख्य म्हणजे मोदींचे व्हिजन असा काही हा प्रकार नाही. माझा काही तो वारसा हक्क नाही. 15-20 लाख लोकांचे विचार या व्हिजनमध्ये आहेत.
प्रश्न : मोदी की गॅरंटी ही तुमची संकल्पना कमालीची लोकप्रिय होते आहे. लोक म्हणतात, उमेदवार बघायचेच नाहीत, मत द्यायचे ते मोदींना. निवडणुकांच्या काळात अशा संकल्पना महत्त्वाच्या असतात?
मोदी : निवडणुकांतून उमेदवार महत्त्वाचे असतातच. प्रत्येक मतदारही महत्त्वपूर्ण असतो. बूथ कार्यकर्ताही गरजेचा असतो. राहिला प्रश्न मोदी की गॅरंटी या संकल्पनेच्या लोकप्रियतेचा; तर मी दिलेल्या शब्दात माझी कमिटमेंट असते, एवढेच मी सांगू शकतो. इतरांप्रमाणे, चलती का नाम गाडी किंवा कुछ भी बोल दो, असे मी करत नाही.
मी एका झटक्यात गरिबी दूर करेन, असे एक नेता सध्या म्हणतो आहे. आता 5-6 दशकांपर्यंत ज्यांनी शासन केले, ते जर एका झटक्यात गरिबी दूर करणार असतील तर लोकांनाही झटकाच बसेल ना! कोण विश्वास ठेवेल? विकसित भारतासाठी पायाभूत सुविधांवर प्रचंड काम गेल्या 10 वर्षांत झालेले आहे. पुढील कालावधीत कौशल्यविकास साधावा लागेल, असे माझे म्हणणे आहे.
प्रश्न : आधी इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा, असे म्हटले जायचे. आता मोदी इज भारत, भारत इज मोदी, असे म्हणतात. तुम्ही त्या पातळीपर्यंत पोहोचलात, असे तुम्हाला वाटते?
पंतप्रधान मोदी : मी भारतमातेचा एक पुत्र आहे, जसे इतर सगळे आहेत. मी भारतमातेची सेवा करतो आहे. एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे.
प्रश्न : तामिळनाडूतून सनातन धर्माविरुद्ध वक्तव्ये आलेली आहेत. तुम्ही काय म्हणाल?
पंतप्रधान मोदी : हा प्रश्न तुम्ही काँग्रेसला विचारायला हवा. जे लोक (द्रविड मुन्नेत्र कळघम) सनातन हिंदू धर्माविरुद्ध गरळ ओकत असतात, त्यांच्यासोबत तुम्ही का आहात? का इतके तुम्ही असहाय आहात? द्रमुकविरुद्ध संतापाची लाट आहे आणि ही लाट सकारात्मक रूप धारण करून भाजपच्या दिशेने वळते आहे.
प्रश्न : रशिया-युक्रेन युद्ध थांबावे म्हणून तुम्ही मध्यस्थी केली होती?
पंतप्रधान मोदी : दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी माझी मैत्री आहे. मी युद्धग्रस्त भागात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी या मैत्रीचा सदुपयोग केला.
प्रश्न : अ‍ॅलन मस्क भारतात येणार आहेत. ते तुमचे चाहतेही आहेत. स्टारलिंक, टेस्लाचे कारखानेही भारतात येतील?
मोदी : मस्क हे भारताचे चाहते आहेत आणि राहिला विषय देशात त्यांचे कारखाने उभे राहण्याचा, तर केवळ मस्क नव्हे तर अवघ्या जगासाठीच भारत इंडस्ट्रिअल हब व्हावा, याच दिशेने आम्ही निघालेलो आहोत.
प्रश्न : निवडणूक रोखे आणि भ्रष्टाचार अशी सांगड घातली जात आहे. त्याबद्दल काय सांगाल?
पंतप्रधान मोदी : निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांना पूर्वापार देणग्या दिल्या जात आहेत. काही त्यात नवे नाही. उलट त्यासाठी एक रीतसर पर्याय आम्ही उपलब्ध करून दिला. कुणी निधी दिला, किती निधी दिला, हे सगळे स्पष्ट दिसते आहे. बँकेकडे सगळा डेटा आहे. काही उणिवा असतील, तर त्या दूर होतील. निवडणूक रोख्यांना विरोध करणार्‍यांवर एक दिवस पश्चात्तापाची वेळ येईल.
प्रश्न : मध्यवर्ती यंत्रणांचा वापर विरोधकांविरुद्ध केला जात असल्याचा आरोप होतो. त्याबद्दल काय?
पंतप्रधान मोदी : सक्तवसुली संचालनायलाने (ईडी) 97 टक्के कारवाई गुन्हेगारांविरोधात तसेच भ्रष्ट अधिकार्‍यांविरोधात केलेली आहे. ईडीने कारवाई केली, अशा लोकांत केवळ 3 टक्के राजकारणी आहेत. मी सर्व मध्यवर्ती यंत्रणांना थेट सांगितले की, बचावात्माक पवित्रा तुम्ही कायमचा सोडा. गुन्हेगारी घटकांकडून उच्चांकी पैसा मध्यवर्ती यंत्रणेने जप्त केला असेल, तर त्यात वावगे काय आहे. ड्रग्ज तस्करांवर धडक कारवाई यंत्रणांनी केलेली आहे. करू नये काय?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news