परभणी: माटेगाव नदीवरील पूल बांधकामाच्या खड्ड्यात  कार कोसळली | पुढारी

परभणी: माटेगाव नदीवरील पूल बांधकामाच्या खड्ड्यात  कार कोसळली

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील पूर्णा-झिरोफाटा मुख्य रस्त्यावर असलेल्या माटेगावजवळच्या नदीवरील पुलाच्या पिल्लर बांधकामाच्या खड्यात कार कोसळली. ही घटना  (दि. २९) आज पहाटे ४. ३५ च्या सुमारास घडली. अंधारात खड्याचा अंदाज न आल्याने  कार चालकाचे नियंत्रण सुटले. आणि कार दहा ते पंधरा फूट खोल खड्यात पडली. कार चालकास किरकोळ दुखापत झाली.   दरम्यान, घटनास्थळी पूर्णा पोलीस ठाण्याचे सपोनि दर्शन शिंदे यांनी सकाळी धाव घेवून पाहणी केली.

या विषयी सविस्तर वृत्त असे की, पूर्णा झिरोफाटा रस्त्यावरील माटेगाव गावजवळील नदीवर गेल्या अनेक महिन्यापासून पुलाचे नवीन बांधकाम कासवगतीने चालू आहे. सबंधित गुत्तेदाराने या पुलाच्या बांधकामासाठी रस्त्याला खेटून पिल्लर उभारणीकरीता मोठे खड्डे खोदले आहेत. आज पहाटे पूर्णेकडून झिरोफाटाकडे (एम एच २६ बिजी ७७०७) या क्रमांकाची ईनोव्हा कार घेऊन शुभम मुंजाजी पुशट (रा. सुनेगाव, जि. नांदेड) निघाला होता. यावेळी माटेगाव नदीवरील पूल बांधकामाजवळ येताच अंदाज न आल्याने खोल खड्यात जावून कारसह पडला. अक्षरशः कार उलटून उबडी पडली असता चालक शुभम व त्याचा गाडीतील साथीदार विजय माणिकराव वाडेवाले ( रा.पेठशिवणी,  ता पालम)  हे कारमध्ये अडकून त्यांना किरकोळ मार लागला. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.

या पुलाचे बांधकाम गुत्तेदार अतिशय धीम्या गतीने करीत असल्यामुळे तेथे खोदून ठेवलेले खड्डे येथून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना जीवघेणे ठरत आहेत. पावसाळा सुरु होण्यास एक महिनाच शिल्लक असताना या पुलाच्या पिल्लरची देखील उभारणी झाली नाही. तर संपूर्ण पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अशक्य आहे. परिणामी, पुलाअभावी पावसाळ्यात येथून वाहतूक बंदच राहती की काय? असा प्रश्न नागरिकांसह प्रवाशांना पडला आहे. याकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी माटेगावातील नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा 

Back to top button