Lok Sabha Election 2024 : नांदेड, हिंगोली, लातूरमध्ये थेट लढती | पुढारी

Lok Sabha Election 2024 : नांदेड, हिंगोली, लातूरमध्ये थेट लढती

धनंजय लांबे

जाती-पातीची गणिते, आर्थिकदृष्ट्या ‘इलेक्टिव्ह मेरिट’ आणि पक्षातील वजन या निकषांवर काही उमेदवार जाहीर झालेले असले, तरी याच निकषांवर एकापेक्षा जास्त तुल्यबळ दावेदार उभे राहिल्यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये महायुती आणि महाआघाडीचे उमेदवार कोण, हे स्पष्ट झालेले नाही. काही ठिकाणी तिसरा उमेदवार जाहीर न झाल्यामुळे युती व आघाडीतही सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेच्या (उबाठा) पहिल्या यादीत विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली. त्यात धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांना, तर परभणीतून संजय जाधव यांना संधी मिळाली. छत्रपती संभाजीनगरात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचेही नाव पक्षाने जाहीर केले. मात्र, या दोन्ही मतदार संघांतून तीनपैकी कोणत्या पक्षाला संधी द्यावी, यावर महायुतीचे एकमत झालेले नाही. परभणीतून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी स्वत:च उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यांना युतीतील तीन पक्षांचा पाठिंबा आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.
नांदेडमध्ये भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण अशी लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीची भूमिका अजूनही स्पष्ट नसल्यामुळे चुरस त्यावर अवलंबून आहे. तूर्त तरी महायुती विरुद्ध महाआघाडी असे चित्र आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे चिखलीकर यांचे पारडे जड आहे. तथापि चव्हाण यांच्या निर्णयामुळे काँग्रेसचे काही मूळ कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत. या नाराजीला चिखलीकर यांंना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

लातूरमध्ये भाजपचे विद्यमान खासदार सुधाकरराव श्रृंगारे आणि काँग्रेसचे डॉ. शिवाजीराव काळगे अशी थेट लढत अपेक्षित आहे. श्रृंगारे यांना महायुतीतील तिन्ही पक्षांचे पाठबळ आहे. परंतु, डॉ. काळगे यांच्यासाठी फक्त काँग्रेसचेच प्रयत्न दिसत आहेत. डॉ. काळगे यांनी नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवा केली आहे. श्रृंगारे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारीही आग्रही होते, हे विशेष.

काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचे राजीनामे

हिंगोलीत शिवसेनेने विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची, तर उबाठा गटाने माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर (हदगाव) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. उबाठा गटाने कोणतीही चर्चा न करता राज्यातील उमेदवार जाहीर केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने आधीच नाराजी व्यक्त केली आहे. आष्टीकर यांची उमेदवारी जाहीर होताच हिंगोली काँग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांनी थेट राजीनामे दिले. हिंगोलीतून दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनीही निवडणूक लढवावी, असा त्यांच्या समर्थकांचा आग्रह होता. त्यामुळे या मतदार संघातून आष्टीकर यांना चांगलाच संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत. छत्रपती संभाजीनगरात महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही आणि बीड, जालना, धाराशिवमध्ये महाआघाडीने उमेदवार जाहीर केलेले नाहीत. नेमक्या कोणत्या पक्षाला उमेदवारी द्यावी, यावरूनच राज्य पातळीवर काथ्याकूट सुरू आहे. हा तिढा मिटल्यानंतरच लढतींचे चित्र स्पष्ट होइल.

Back to top button