हिंगोली : भाटेगाव शिवारात अपघातग्रस्त टेम्पोतील द्राक्ष खाण्यास झुंबड | पुढारी

हिंगोली : भाटेगाव शिवारात अपघातग्रस्त टेम्पोतील द्राक्ष खाण्यास झुंबड

आखाडा बाळापूर : पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव शिवारात आज (दि.११) दुपारी दीडच्या सुमारास नांदेड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर द्राक्ष घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाला. या अपघातात चालकासह त्याचा सहकारी जखमी झाला. दोघांनाही उपचारासाठी नांदेड येथे पाठविल्यानंतर टेम्पोमध्ये असलेल्या द्राक्षावर जमावाने यथेच्छ ताव मारला. काहींनी तर कॅरेटमधील द्राक्ष बॅगेत टाकून घटनास्थळावरून काढता पाय घेतला. टेम्पोमध्ये जवळपास ८ टनापेक्षा अधिक द्राक्ष होती. तासभरात निम्मी द्राक्ष लंपास झाल्याचे प्रत्यक्षदर्शनींनी सांगितले.

कोल्हापूर येथून (एमएच 24 ए.यु. 9965) या नंबरच्या टेम्पोमध्ये कॅरेटमधून द्राक्षाची आसामकडे वाहतूक केली जात होती. आज दुपारी दीडच्या सुमारास नांदेड-हिंगोली मार्गावर ट्रक असला असताना भाटेगावजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला. यात विकास जनार्धन हुळे व अमोल भागवत वाकळे (रा. चाकूर) हे दोघे जखमी झाले. दोघांना उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले.

टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष होते. रस्त्यावरून येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांनी टेम्पोजवळ जात कॅरेटमधील द्राक्ष काढून घेण्याचा सपाटा लावला. तासभरात निम्यापेक्षा अधिक द्राक्ष फस्त झाली. त्यानंतर डोंगरकडा चौकीचे पोलीस कर्मचारी नागोराव बाभळे यांनी प्रतिबंध घातला. टेम्पो पलटी झाल्याने प्रवाशांची मात्र द्राक्ष खावून यथेच्छ आनंद लुटल्याचे दिसून आले.

हेही वाचा 

Back to top button