Dhananjay Munde: शिवरायांचे विचार वाचून शिवजयंती साजरी करा; धनंजय मुंडे यांचे आवाहन | पुढारी

Dhananjay Munde: शिवरायांचे विचार वाचून शिवजयंती साजरी करा; धनंजय मुंडे यांचे आवाहन

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा: आजच्या सोशल मीडियाच्या युगात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देऊन, स्टेट्सला फोटो ठेवून शिवराय कळणार नाहीत. तर शिवराय हे त्यांच्या विचारातून आणि कार्यातून समजत असतात. त्यामुळे तरूणांनी शिवरायांचे विचार वाचून शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. Dhananjay Munde

युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने १२ ते १९ फेब्रुवारी दरम्यान राज्यभर स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्वराज्य सप्ताहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वेरूळ येथील मालोजीराजे भोसले गढीसमोर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रयतेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. Dhananjay Munde

याप्रसंगी व्यासपीठावर आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.आ.कैलास पाटील, महिला जिल्हाध्यक्ष स्वाती कोल्हे, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, सुनील मगरे, अशोक गायकवाड, संतोष कोल्हे, अभिजीत देशमुख, जुबेरलाला,रावसाहेब फुलारे, अंकुश काळवणे, महेश उबाळे, ज्ञानेश्वर दुधारे, सुनीता आहेवाड, दत्ता भांगे, गजानन फुलारे, अनुराग शिंदे, विनोद जाधव, प्रभु बागुल आदींची उपस्थिती होती.

मुंडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ओळख प्रत्येकाच्या मनात कोरली जावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने हा स्वराज्य सप्ताह आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, स्वराज्यात शेतकर्‍यांचे रक्षण झालं पाहिजे, त्यांचा शेतसारा माफ झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला आठवतात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज आपण हा शिवमहोत्सव स्वराज्याची शपथ घेऊन साजरा करत आहोत. मा.आ.कैलास पाटील, स्वाती कोल्हे यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. महेश उबाळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. समाधान इंगळे यांनी सुत्रसंचालन केले. तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण यांनी आभार मानले.

हेही वाचा 

Back to top button