छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पत्नीसोबत वाद झाल्यावर घरातून निघून गेलेल्या पतीला त्याच्याच चुलत भावाने गायब केल्याचा धक्कादायक प्रकार तब्बल १४ महिन्यांनंतर समोर आला. खून पचविला, असे अर्विभावात बोलणाऱ्या आरोपीचा एक व्हिडिओच नातेवाईकांना मिळाला. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. आता पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
अविनाश तुकाराम साळवे (४१, रा. पिंपळनेर, ता. लोणार, जि. बुलढाणा, ह.मु. जे सेक्टर, मुकुंदवाडी) असे बेपत्ता मजुराचे तर, राहुल ऊर्फ बाळ्या किसन साळवे (३२, ह.मु. पुष्पनगरी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अविनाश हा खासगी वाहनावर चालक तर राहुल हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. Chh. Sambhajinagar Murder Case
अधिक माहितीनुसार, बेपत्ता अविनाश हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करायचा. त्यानिमित्ताने ते अनेक दिवस बाहेर राहायचे. दरम्यान, २ जानेवारी २०२३ रोजी अविनाश यांचे पत्नीसोबत घरगुती कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर ३ जानेवारी २०२३ रोजी तो घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेला. त्यानंतर चुलत भाऊ राहुल साळवे याच्या पुष्पनगरी येथील घरी गेल्याचे फोन करून सांगितले होते. त्यानंतर अविनाश साळवे अद्यापपर्यंत घरी परतला नाही. गेल्या १४ महिन्यांपासून त्यांचा काहीही शोध लागला नाही. Chh. Sambhajinagar Murder Case
दरम्यान, आरोपी राहुल साळवे याचा खून पचविला, असे बोलल्याचा एक व्हिडिओ नातेवाईकांना प्राप्त झाला आहे. त्यावरून राहुल साळवे यानेच चुलत भाऊ अविनाश साळवे यांना जमिनीच्या वादातून गायब केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. त्यावरून अविनाश यांची पत्नी अमृता साळवे (वय ३५) यांच्या फिर्यादीवरून क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत.
अविनाश साळवे ३ जानेवारी २०२३ पासून बेपत्ता आहे. मात्र, त्याच्या बेपत्ताची नोंद पत्नी अमृता यांनी १७ मार्च २०२३ रोजी म्हणजे, तब्बल अडीच महिन्यांनंतर केली. त्यांनी क्रांती चौक ठाण्यात याबाबत नोंद केली होती. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार पी. के. खांड्रे यांच्याकडे होता. मात्र, हा तपास पुढे गेला नाही.
आरोपी राहुल ऊर्फ बाळ्या साळवे याने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, राहुल आणि अविनाश हे दोघे ३ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी सातारा परिसरातील सुधाकरनगर भागात असलेल्या वाल्मीच्या तलाव परिसरात गेले. तेथे दोघांनी मद्यपान केले. त्यानंतर राहुलने अविनाशची हत्या करून त्याला धुळे-सोलापूर महामार्गावर पाईपलाइनसाठी खोदलेल्या खड्ड्यात पुरले. काही दिवसांनी त्याच खड्ड्यात संबंधित एजन्सीने पाईप टाकून तो खड्डाही माती टाकून झाकला. त्यामुळे अविनाशचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता.
आरोपी राहुल याने अविनाशला ज्या ठिकाणी पुरले, ती जागा त्याने क्रांती चौक पोलिसांना दाखविली आहे. क्रांती चौक पोलिसांनी त्या जागेवर खोदकाम करण्याची परवानगी घेण्यासाठी न्यायालय, मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी ठिकाणी पत्रव्यवहार केला आहे. पोलिसांना खोदकामाची परवानगीही मिळाली आहे. शनिवारी हे खोदकाम होणार आहे.
अविनाश साळवेचा आरोपी राहुल साळवे याने खून केला की काय?, असा संशय असल्याने तपास अधिकारी प्रभाकर सोनवणे यांनी त्याला अटक करून शुक्रवारी (दि. १६) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अधिक तपासासाठी राहुल साळवेला १९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाकडून अॅड. ए. जी. काझी आणि आरोपीकडून अॅड. दिलीप खंडागळे यांनी काम पाहिले.
हेही वाचा