Chh. Sambhajinagar : तिसगाव येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दूधातून विषबाधा | पुढारी

Chh. Sambhajinagar : तिसगाव येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दूधातून विषबाधा

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेतील ९० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आज (दि. १३) सकाळी आठ वाजता दुधातून विषबाधा झाली. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ आणि ग्रामीण रुग्णालय खुलताबाद येथे दाखल करण्यात आले. Chh. Sambhajinagar

याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे तिसगाव (ता.खुलताबाद) येथील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवासासह भोजन आणि शिक्षण अशा सुविधा शासनाच्या वतीने देण्यात येतात. या ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या ३१७ असून आज सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांना आश्रम शाळा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध झालेले दूध देण्यात आले होते. हे दूध पिताच विद्यार्थ्यांना मळमळ उलट्या जुलाब यासारख्या त्रास जाणवू लागल्याने काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली होती. संबंधित आदिवासी शाळा प्रशासनाने तातडीने ९६ विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय खुलताबाद आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आले. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आल्यावर सलाईन देण्यात आली तसेच औषधोपचार सुरू आहे.

दूध घेतल्यानंतर ९६ मुलांना उलट्या मळमळ सुरू झाली. ग्रामीण रुग्णालयात खुलताबाद येथे २७ मुले दाखल केली आहेत. याबाबत वरिष्ठांना कळवले आहे. संबंधितांवर पुढील कारवाई करण्यात येईल.
– विलास कटारे, मुख्याध्यापक, (शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, तिसगाव)

तिसगाव आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दूध घेतल्यानंतर उलट्या, मळमळीचा त्रास सुरू झाला. विद्यार्थ्यांवर औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची तब्येत आता स्थिर आहे.
-दिपाली भांदुके, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ

तिसगाव आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकार पळवा पळवी करण्यात व्यस्त असून या ठिकाणी विद्यार्थ्यांवर देखरेख करण्यासाठी कोणतीही भक्कम यंत्रणा नाही. गरीब विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. जे जबाबदार असतील त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी.

सतीश देवेंद्र लोखंडे, वेरूळकर

प्रदेश युवा संघटनमंत्री, आम आदमी पार्टी, महाराष्ट्र

हेही वाचा 

Back to top button