बीड: रोहितळ येथे भरदिवसा डॉक्टराचे घर फोडले | पुढारी

बीड: रोहितळ येथे भरदिवसा डॉक्टराचे घर फोडले

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : मागील आठवड्यात झालेल्या घरफोडीच्या घटनेचा तपास लागण्यापूर्वीच रोहीतळ येथील एका डॉक्टरचे भरदुपारी घर फोडले. रोख २५ हजार आणि १० ग्रॅम सोने असा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना आज (दि.१४) दुपारी घडली.

रोहितळ (ता. गेवराई) येथे मागील आठवड्यात शिवलिंग गायकवाड या कापूस व्यापा-याचे अज्ञात चोरट्यांनी घर फोडून ३ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेच्या तपास लागण्यापूर्वीच आज डॉ. किरण ढगे यांच्या घरात चोरी झाली. ढगे यांच्या पत्नी गावात किर्तनास गेल्या होत्या. त्यातच सध्या सुगीचे दिवस असल्याने गावात शुकशुकाट होता. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी भरदुपारी ढगे यांचे घर फोडले. आणि रोख २५ हजार व १० ग्रॅम सोने असा साधारण एक लाखाचा मुद्देमाला चोरून नेला.

या घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके, फौजदार स्वप्नील कोळी, बीट जमादार हरिभाऊ बांगर, भगवान खाडे घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. दरम्यान, रोहितळ येथे चोरीची दुसरी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा 

Back to top button